मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीची खरी टसन तर सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. अॅन्टी प्रचाराची धूम सोशल मीडियावर आहे. पक्ष आणि उमेदवारांवर सडकून टीका सुरू आहे. यात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चांगलीच जुंपली आहे. भक्त, पप्पू, चौकीदार, चमचे, ढक्कन असे शब्दप्रयोग एकमेकांना उद्देशून केले जात आहेत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपला नेता, पक्ष कसा श्रेष्ठ आहे, हे सिद्ध करण्यासाठी अर्वाच्च शब्दांचाही वापर करताना दिसत आहेत.भाजपाने तिकीट वाटपात ज्येष्ठ नेत्यांना डावलल्यावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर एक पोस्ट आली. (अडवाणी बसमध्ये चढले, कंडक्टरने त्यांना विचारले तिकीट आहे का? अडवाणी त्याच्याकडे रागाने बघत म्हणाले बोगस बात मत कर...) मोदींच्या १५ लाखाच्या आणि राहुल गांधीच्या ७२ हजाराच्या घोषणेवर सोशल मीडियावर टर उडविली जात आहे. चौकीदार आणि पप्पूने तर सोशल मीडियावर धूम ठोकली आहे. भक्त कसा ओळखावा... याच्या टीप्स दिल्या आहे. पारिवारिक पार्टी व घराणेशाही, गरिबी हटावच्या चवथ्या पिढीचा नारा चांगलाच गाजतो आहे. महागाई, राममंदिर, राफेल, बुलेट ट्रेन, स्टॅच्यु आॅफ युनिटी, भाजपाचे मुख्यालय, खराब दिन, अच्छे दिन यावर जोरदार शेरेबाजी सुरू आहे. या टिप्पणीतून पक्षाची, उमेदवाराची इमेज तयार करण्यासाठी सोशल मीडियावर कार्यकर्त्यांची धूम आहे. भाजपाच्या अॅन्टी पोस्टवर भाजपाचे कार्यकर्ते हर हर मोदी... घर घर मोदी अशा कमेंट करीत मोदींच्या कामांचा गुणगौरव करीत आहेत. तर राहुलविरोधात कमेंट असेल तर ‘सबकी यही पुकार, काँग्रेस है इस बार’ असे कमेंट्स करून नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारीचे संदर्भ जोडीत इमेज तयार करीत आहे. काही कार्यकर्ते पप्पू, ढक्कन, चमचा, चौकीदार अशा कमेंट्स टाकून आपली भडास काढत आहे. कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या टोलेबाजीवर काही लक्षवेधी पोस्टसुद्धा सामान्यांच्या आहे. यात बॉक्सिंगच्या रिंगणात ग्लोज् घालून उमेदवार उभे आहेत आणि कार्यकर्तेच एकमेकांवर तुटून पडले आहे. काही पोस्ट रंजकसुद्धा आहे. मायावती अखिलेश यांच्यावरही जोक्स चांगलेच व्हायरल होत आहे. प्रचाराच्या या रंजकतेचा सामान्य मतदार चांगलाच आनंद लुटत आहे.
लोकल स्तरावर उमेदवारांचा प्रचारनागपूर लोकसभा मतदार संघात कार्यकर्त्यांमध्ये आपल्या नेत्यांची प्रतिष्ठा उंचाविण्याची त्याचा जास्तीत जास्त प्रचार करण्याची होड लागली आहे. प्रचाराच्या रॅली, मेळावे, उमेदवाराच्या मुलाखती सोशल मीडियावर धडाक्याने टाकल्या जात आहे. काँग्रेसचे कार्यकर्ता म्हणतातहेत ‘आपला नाना निवडून आणा’ तर भाजपावाले म्हणतात ‘कहो दिलसे, गडकरी फिरसे’. अशा घोषणांचा सध्या सोशल मीडियावर पाऊस पडतो आहे.