नागपूर : अजनी रेल्वे काॅलनी परिसरातील प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशनच्या कामाचा नव्याने विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येईल, असे केंद्रीय मंत्र्यांनी नुकतेच स्पष्ट केले हाेते. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) प्रकल्पासाठी घाई झाल्याचे दिसून येत आहे. नवीन डीपीआर तयार हाेण्यापूर्वीच कंत्राट दिलेल्या कंपनीने कामाची प्रक्रिया सुरू केली असून यानुसार अजनीवनाचा थाेडासा भाग जाळण्यात आल्याची व दाेन-चार झाडे ताेडण्यातही आली आहेत.
प्रस्तावित आयएमएस प्रकल्पामध्ये अजनीवनातील ७००० वर झाडे कापली जाणार असून, येथील शाळा व १०० वर्षांची वारसास्थळेही पाडली जाणार आहेत. त्यामुळे अजनीवनातील हजाराे झाडे वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी प्रकल्पाविराेधात अनेक आंदाेलने केली आहेत व आजही त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. जनभावनेची दखल घेत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अजनीतील झाडे ताेडली जाणार नाहीत आणि प्रकल्पासाठी नवीन डीपीआर तयार करण्यात येईल, असेही स्पष्ट केले. असे असताना अजनी काॅलनी परिसरात कामाची तयारी सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. उल्लेखनीय म्हणजे एनएचएआयद्वारे जुन्या डीपीआरच्या आधारावर आयएमएसचे कंत्राट दिलेल्या कंपनीनेच तयारीचा साज थाटला आहे.
अजनीवन वाचवा आंदाेलनात सक्रिय भूमिका घेतलेले तरुण पर्यावरणप्रेमी कुणाल माैर्य यांनी सांगितले, काही दिवसांपूर्वी येथे साॅईल टेस्टिंगचे काम सुरू झाले. त्यानंतर हळूहळू अजनीतील दरगाहच्या मागच्या परिसरात कंपनीचे साईट ऑफीस थाटण्यात आले. २० ते २५ कर्मचारी काम करीत आहेत. तीन दिवसापूर्वी येथील काही लहान-माेठी झाडे ताेडल्याचे लक्षात आले. दरम्यान वनाचा काही परिसरात जाळण्यातही आल्याचे आमच्या निदर्शनास आले. गुरुवारी सकाळी कामाच्या ठिकाणी चाैकशी केली असता येथील कामगार काही क्षणात पळून गेल्याचे माैर्य यांनी सांगितले. यावरून कंपनीद्वारे लपूनछपून काम केले जात असल्याचा आराेप त्यांनी केला आहे.
उद्यान विभागाच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, अजनीवन भागात हाेत असलेल्या प्रकाराबाबत पर्यावरणप्रेमींनी महापालिकेच्या उद्यान विभागाला माहिती दिली. विशेष म्हणजे उद्यान विभागाला यातील काही माहीत नसावे, हाही प्रश्नच आहे. आता माहिती मिळाल्यानंतर विभाग काय कारवाई करते, याकडे आंदाेलकांचे लक्ष लागले आहे.