लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रस्तावित ‘ब्रॉडगेज मेट्रो’चे काम लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात मंगळवारी या विषयावर झालेल्या चर्चेनंतर याबाबत संकेत मिळाले आहेत. गडकरी यांनी ‘ब्रॉडगेज मेट्रो’चा ‘रोड मॅप’च रेल्वेमंत्र्यांसमोर मांडला व हा प्रकल्प तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरेल, अशी माहिती दिली.
नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत गडकरी यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर या प्रकल्पावर विस्तृत माहिती दिली. ‘ब्रॉडगेज’वर धावणारी हा देशातील पहिला ‘मेट्रो रेल्वे’ प्रकल्प असेल. यासंदर्भात कागदोपत्री आवश्यक असलेली कामे झाली आहेत. प्रकल्पाला हिरवी झेंडीदेखील मिळाली आहे. आता लवकरात लवकर प्रत्यक्ष काम सुरू होण्याची गरज आहे. या प्रकल्पामुळे नागपूरच नव्हे तर विदर्भातील इतर जिल्ह्यांनादेखील फायदा होईल, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
सात मार्गांवर धावणार ‘मेट्रो’
‘ब्रॉडगेज मेट्रो’ एकूण सात मार्गांवर धावेल. कामठी, वर्धा, काटोल, उमरेड, रामटेक, भंडारा, नरखेड यांना नागपूरशी जोडण्यात येईल. नागपुरात ‘मेट्रो’ सुरू झाली आहे. ‘ब्रॉडगेज मेट्रो’देखील वातानुकूलित असेल व प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. पार्सल व सामान पाठविण्यासाठी वेगळे कोच राहतील, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.