नागपूर : उत्तर नागपुरातील वनदेवीनगरातील मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरण गेल्या २ वर्षापासून रखडले आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचा दावा आहे की सिमेंटीकरणाचे काम बऱ्याच प्रमाणात झाले आहे. फक्त अॅप्रोच रस्त्याचे काम शिल्लक आहे. विभागाचा दावा आहे की जानेवारी २०२१ मध्ये रस्त्याचे पूर्ण काम होईल. लोकमतच्या टीमने या रस्त्याचा आढावा घेतला असता, अर्धवट केलेले सिमेंटीकरण, चौकातील रस्ता समतोल न करता काम अर्धवट सोडले होते. रस्त्यावर पसरलेले साहित्य, धूळ यामुळे नागरिकांना अडचण होत होती. स्थानिक लोकांच्या मते रस्त्यावर वाहने चालविणे कठीण झाले आहे. हाच एकमेव रस्ता असल्याने नाईलाजास्तव वाहने चालवावी लागत आहे.
एनआयटी बर्खास्त झाल्याने वाढला त्रास
वनदेवीनगरच्या मुख्य रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम केंद्र सरकारकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निधीतून होत आहे. या रस्त्याचे सिमेंटीकरण वनदेवीनगर, पिवळी नदीचा पूल प्रोजेक्ट करण्यात येत आहे. या रस्त्याला पिवळ्या नदीवरील बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलाला जोडण्यात येत आहे. खरे तर पुलाचे काम अर्धवटच आहे. मनपाच्या सीमेवर असलेल्या वनदेवीनगरच्या रस्त्याचा मालकी हक्क नागपूर सुधार प्रन्यासकडे होता. परंतु एनआयटी बर्खास्त झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अडचणी वाढल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. ते हटविणे आव्हानात्मक होते. अतिक्रमण काढण्यासाठी मनपाचे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे अतिक्रमण काढण्यासाठी बराच कालावधी लोटला. नंतर पावसामुळे काम अडकले. परत निधीची समस्या आली. या रस्त्याच्या कामासाठी सुरुवातीपासून सरकार व प्रशासनाने दुर्लक्ष केले. सध्या अर्धवट कामामुळे अडचणी वाढल्या आहे.
- लॉकडाऊनमुळे रखडले काम
रिंग रोड वीट भट्टी चौक ते चांभार नाला चौक दरम्यान सिमेंटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. फक्त अॅप्रोच रोड राहिला आहे. मध्ये असलेल्या चेंबरचे काम अर्धवट आहे. त्यामुळे एका बाजूचे काम बंद ठेवले आहे. लॉकडाऊनच्या कारणाने काम बंद होते. आता विभागाने काम सुरू केले आहे. जानेवारीपर्यंत काम पूर्ण होईल.
- चंद्रा गिरी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग