नागपूर : राज्य प्राणी, राज्य पक्षी या धर्तीवर राज्य कीटक मानचिन्हांची निवड करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. जून महिन्यात ही समिती आपला अहवाल देणार असल्याची माहिती आहे.
राज्यातील दुर्मिळ जैवविविधतेसोबतच दुर्मिळ कीटकांचे जतन व्हावे, त्यांचे अध्ययन करता यावे, यासाठी वनविभागाच्या पुढाकाराने या समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीमध्ये कीटकशास्त्राचे अभ्यासक, वन्यजीव अभ्यासक, ज्येष्ठ वन अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीच्या स्थापनेला दोन महिने झाले असून, अहवाल देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
राज्यातील दुर्मिळ प्रजातींचे रक्षण व्हावे, त्यांचे वैशिष्ट्य अभ्यासकांना आणि पुढील पिढीला कळावे, पक्षी, प्राणी, कीटकांच्या माध्यमातून होणाऱ्या जैवविविधतेचे रक्षण करण्यास सहाय्य व्हावे, यासाठी वन विभागाच्या पुढाकाराने मागील काही वर्षांत राज्य मानचिन्हे घोषित केली जात आहेत. अलीकडेच कांदळवनातील चिप्पी वृक्षाला मान्यता देण्यात आली. त्यापूर्वी राज्य फुलपाखरू घोषित करण्यात आले. या प्रक्रियेतील पुढील भाग म्हणून राज्य कीटक मानचिन्हांची निवड केली जाणार आहे.
...
ही समिती राज्यातील लहान कीटकांचा अभ्यास करेल. दुर्मिळ असलेले आणि वेगळी वैशिष्ट्य असलेल्या कीटकांची राज्य कीटक म्हणून निवड केली जाणार आहे. कीटकांचे जतन व्हावे, पुढच्या पिढीमध्ये अभ्यासात्मक वृत्ती जागी व्हावी, जैवविविधतेचे संगोपन व्हावे, यासाठी हा प्रयत्न आहे.
- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)
...