समाजाला संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी कार्य करेन : न्या. भूषण गवई यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:27 PM2019-06-14T23:27:34+5:302019-06-14T23:31:16+5:30

संविधान हे जनतेला रक्तविरहित सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देण्याचे साधन आहे, असे संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्य करताना या तत्त्वावर चालून समाजाला संविधानिक अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, असे सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितले.

Work to get constitutional rights to the community: Justice Bhushan Gavai | समाजाला संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी कार्य करेन : न्या. भूषण गवई यांची ग्वाही

समाजाला संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी कार्य करेन : न्या. भूषण गवई यांची ग्वाही

Next
ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यानिमित्त सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संविधान हे जनतेला रक्तविरहित सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देण्याचे साधन आहे, असे संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्य करताना या तत्त्वावर चालून समाजाला संविधानिक अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, असे सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितले. 


हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे न्या. गवई यांचा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्यांनी सत्काराला उत्तर देताना संविधान, आतापर्यंतचा कार्यकाळ, स्वत:चे निर्णय, कुटुंबीय, मित्र, आठवणी इत्यादीवर भावना व्यक्त केल्या. सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते न्या. गवई यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर व सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत अधिकार व डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स यांना एकमेकांपेक्षा कमीजास्त महत्त्व दिले जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. हे दोन्ही संविधानाचा आत्मा असल्याचेही सांगितले आहे. तसेच, संविधानाच्या २२६ व्या आर्टिकलमध्ये न्यायदानाच्या अधिकारासह खरा न्याय देण्याच्या कर्तव्याचादेखील समावेश आहे. न्यायदान करताना ही तत्त्वे सतत लक्षात ठेवावी लागणार आहेत. काही प्रकरणावर दिलेल्या निर्णयामुळे आत्मिक समाधान मिळते. असे काही निर्णय आपणही दिले असे न्या. गवई यांनी सांगून कामगारांना वेतनवाढ, प्राध्यापकांना सेवा संरक्षण, अनधिकृत धार्मिकस्थळे इत्यादी प्रकरणांचा आवर्जून उल्लेख केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी कार्य करण्याचे स्वप्न कधीच पाहिले नव्हते. परंतु, कुटुंबीय व मित्रांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. आपल्या यशात वडील रा. सू. गवई, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर व विद्यमान न्यायमूर्ती शरद बोबडे यांचा सिंहाचा वाटा आहे. वकिली सुरू केल्यानंतर राजा भोसले, सी. एस. धर्माधिकारी, भाऊसाहेब बोबडे, व्ही. आर. मनोहर आदींकडून तर, न्यायमूर्ती झाल्यानंतर सहकारी न्यायमूर्तींकडून बरेच काही शिकायला मिळाले. त्यांचाही या यशात मोलाचा वाटा आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये सकारात्मक व नकारात्मक गुण असतात, पण आयुष्यात सकारात्मक विचारांसह पुढे जाणे आवश्यक असते. माझी वैयक्तिक जडणघडण ही आईवडिलांच्या संस्काराची देण आहे अशा भावना न्या. गवई यांनी व्यक्त केली. अ‍ॅड. अनिल किलोर यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील, अ‍ॅड. गौरी वेंकटरमन व अ‍ॅड. संकेत चरपे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अ‍ॅड. वेंकटरमन व अ‍ॅड. प्रीती राणे यांनी संचालन तर, अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार मानले.
अन् न्या. गवई भावूक झाले
सुरुवातीच्या जीवनाची वर्तमान जीवनाशी तुलना करताना न्या. गवई भावूक झाले होते. दरम्यान, लगेच स्वत:ला सावरून ते म्हणाले, आपला झोपडपट्टीत जन्म झाला. मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. त्यावेळी हे यश पदरात पडेल असे कधीच वाटले नव्हते. परंतु, प्रत्येकाचा अंतिम टप्पा ठरलेला असतो. जीवन प्रवासाने मला त्या टप्प्यापर्यंत पोहोचवले आहे.
अन्य मान्यवरांचे विचार
नागपूर बारला दीर्घ व प्रतिष्ठित परंपरा आहे. न्या. गवई यांच्यामुळे या परंपरेचा मान आणखी वाढला. ते वकील असल्यापासून त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यांची गुणवत्ता पाहून ते एक दिवस नक्कीच न्यायमूर्ती होतील असा विश्वास होता. त्यांचे वडील अतिशय नम्र व सुसंस्कृत व्यक्ती होते. ते गुण न्या. गवई यांच्यातही आहेत. सर्वोच्च न्यायालयात कार्य करताना त्यांनी समाजाला न्याय देणे विसरू नये.
विकास सिरपूरकर.

न्या. गवई यांना समाजातील दुर्बल घटकांबाबत विशेष आत्मियता आहे. त्यांच्या निर्णयांत ही बाब झळकते. केवळ न्याय करणे महत्वाचे नसून न्याय झाला हे दिसायलाही हवे हे तत्त्व त्यांच्या निर्णयांतून सत्यात उतरलेले दिसून येते. त्यांनी आतापर्यंत विविध प्रकारच्या प्रकरणांवर अनेक दिशादर्शक निर्णय दिले आहेत.
रवी देशपांडे.

Web Title: Work to get constitutional rights to the community: Justice Bhushan Gavai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.