नागपूर : लॉकडाऊननंतर कोरोना संसर्ग आणि दरदिवशी रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम ही सुरक्षित सुविधा सुरू केली आहे. मिहान, आयटी पार्क आणि लहान कंपन्यांमधील ९० टक्के अभियंते आणि कर्मचारी घरूनच काम करीत असल्याची माहिती आहे. मिहानमधील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या कार्यालयातील अनेक जण कोरोनाग्रस्त असून, सध्या सात ते आठ कर्मचारी कार्यरत आहेत.
मिहान आणि परसोडी येथील आयटी पार्कमधील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम लागू केले आहे. आयटी क्षेत्रातील टीसीएस आणि इन्फोसिस या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जूनपर्यंत घरूनच काम करण्याची मुभा दिली आहे. मिहानमध्ये ल्युपिन फार्मा, टाल, एमआरओ आणि विमानतळावरील काहीच कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात येत आहे. मिहानमध्ये आयटी क्षेत्रातील लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल, टेक महिन्द्रा या कंपन्या असून त्यांचे मोठे कॅम्पस आहे. याशिवाय क्लाऊड डाटा, इन्फोसेप्ट्स, एमआरआर सॉफ्ट आदींसह जवळपास २५ पेक्षा जास्त लहान आयटी कंपन्या असून, त्यांचे कार्यालयही मिहानमध्ये आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, मिहानमध्ये लॉकडाऊनपूर्वी जवळपास २८ हजार कर्मचारी कार्यरत होते. पण लॉकडाऊननंतर ८० ते ९० टक्के कर्मचारी घरूनच काम करीत आहेत. अशीच स्थिती परसोडी येथील आयटी पार्कची आहे. या ठिकाणी ३० पेक्षा जास्त कंपन्या आणि चार हजारापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये आयटी सपोर्ट कर्मचारी वगळता बहुतांश सॉफ्टवेअर अभियंते आणि कर्मचारी घरूनच काम करीत आहेत. ही स्थिती किती दिवस राहील, हे सांगणे कठीण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.