लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’चा प्रभाव टाळण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सर्व शिक्षक, संशोधक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे निर्देश दिले होते. मात्र ‘लॉकडाऊन’ १४ एप्रिलपर्यंत राहणार आहे. अशास्थितीत सर्व पदव्युत्तर विभाग, संलग्नित महाविद्यालये व संचालित महाविद्यालयांचे कामकाज ‘वर्क फ्रॉम होम’ माध्यमातूनच व्हावे,असे नवे निर्देश विद्यापीठाने जारी केले आहेत.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व कुलगुरूंना पत्र पाठवून विशिष्ट सूचना दिल्या. त्याचप्रमाणे राज्य शासनाचेदेखील पत्र आले होते. राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुटी जाहीर केली होती. या कालावधीत शिक्षक, संशोधक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची सूचना करण्यात आली. विशेष म्हणजे शिक्षक व संशोधकांनी या कालावधीत ‘ऑनलाईन कन्टेंट’ विकसित करण्यासदेखील विद्यापीठाने सांगितले होते.दरम्यान ‘लॉकडाऊन’चा कालावधी १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहविभागाचे २४ मार्च रोजीचे पत्र व राज्य शासनाच्या महसूल, वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ मार्च रोजीच्या पत्राचा आधार घेत विद्यापीठाने नवीन निर्देश जारी केले. यानुसार सर्व शिक्षक, संशोधक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ करायचे आहे. सर्वांना केंद्र शासन, राज्य शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेल्या परिपत्रकांमधील निर्देशांचे पालन करणे अनिवार्य असेल. तसेच अत्यावश्यक कारण असेल तर वरिष्ठांच्या सूचनेनुसार शिक्षक, कर्मचाऱ्यांना कार्यालयात त्वरित हजर व्हावे लागेल, असे नवीन परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.