लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : मनसर-तुमसर मार्गाच्या रुंदीकरणासाेबत सिमेंटीकरणाचे काम काही वर्षांपासून सुरू आहे. या कामाचा वेग आधीपासूनच संथ हाेता. काही ठिकाणी विजेचे खांब अडसर ठरत असल्याने ते हटवण्याचे काम रखडल्याने मार्गाच्या कामाचा वेग आधीपेक्षाही संथ झाला आहे. त्यामुळे या मार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास जाण्याची शक्यता मावळली आहे.
या मार्गाच्या कामाला चार वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली हाेती. ते वर्षभरापूर्वीच पूर्ण करावयाचे हाेते. मात्र, अद्यापही पूर्णत्वास गेले नाही. या कामाचे कंत्राट बारब्रिक नामक कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहेत. या मार्गावरील मनसर ते रामटेक शहरालगतच्या अंबाळा वळणापर्यंत अनेक ठिकाणी विजेचे खांब मध्ये आले आले आहेत. यावर उपाय म्हणून महावितरण कंपनीने खांबांवरील विजेच्या तारा काढून त्या काही ठिकाणी भूमिगत टाकण्याचे कामही सुरू केले. मात्र, मुख्य मार्गावरील खांब काढले नाही.
विजेचे खांब काही ठिकाणी मुख्य माग्रावर आले आहेत तर काही ठिकाणी ते सर्व्हिस राेडच्या मध्यभागी आले आहेत. त्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम करावयाचे बाकी आहे. महावितरण कंपनीने विजेचे खांब हटवण्याच्या कामाला वेग दिल्यास राेडची उर्वरित कामे कंत्राटदार कंपनीला तातडीने करणे शक्य हाेईल. विशेष म्हणजे, महावितरण कंपनीने या कामाला आधीच उशीर केला असून, त्यांच्या या कामाचा वेगही बराच संथ आहे. वाहनचालकांसह नागरिकांना हाेणारा त्रास लक्षात घेत ही कामे तातडीने पूर्ण करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
...
वनविभागाची आठकाठी?
विजेचे खांब हटवण्याच्या कामाचा प्रस्ताव कमी किमतीचा असल्याने त्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली नाही. शिवाय, त्या कामाचा वेगही संथ आहे, अशी माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली. रामटेक नजीकच्या खिंडसी परिसरात या मार्गाचे काम रखडले आहे. वनविभागाने आडकाठी निर्माण केल्याने ही समस्या उद्भवल्याचही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या मार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास जाण्याची शक्यता सध्यातरी मावळली आहे.