नागपूर : प्रस्तावित वर्धा - नांदेड नवीन रेल्वे लाईनच्या कामाला अधिक गती देण्यात आली असून आतापर्यंत या रेल्वे मार्गाच्या एकूण कामापैकी ३८.६१ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. एकूण २८४.६५ किलोमिटर लांबीच्या या रेल्वे मार्गाला ३ हजार, ४४५ कोटी, ४८ लाख रुपये खर्चाची तरतुद आहे. त्यासाठी ६० टक्के निधी रेल्वे मंत्रालयाकडून मंजूर असून ४० टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. हा रेल्वे मार्ग २१३८.६३ हेक्टर जमिन क्षेत्रातून पूर्ण केला जाणार असून त्यापैकी १९११.२४ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर, २२७.३९ अर्थात १०.६४ टक्के जमिनीचे भूसंपादन व्हायचे आहे. अनेक पुलांचे कामही पूर्ण झाले असून विद्युतीकरणाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
४८ टक्के निधी खर्च
या रेल्वेमार्गावर एकूण २७ रेल्वेस्थानकं राहणार असून त्यापैकी वर्धा-देवळी-भिडी आणि कळंब या स्थानकांचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. या मार्गादरम्यान ३५ मोठ्या पुलांचे तसेच ७९ लहान पुल आणि रोड अंडर ब्रीजचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी आतापर्यंत ४८ टक्के निधी खर्च झाला आहे.
विदर्भ - मराठवाड्यातील पाच जिल्हे कनेक्ट
वर्धा - नांदेड रेल्वे मार्गाच्या पूर्ततेमुळे विदर्भ मराठवाड्यातील वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली आणि नांदेड हे पांच जिल्हे रेल्वेने कनेक्ट होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील व्यापार-उद्योगाला चालना मिळणार असून नमूद जिल्ह्यातील आर्थिक प्रगती अपेक्षित आहे.