वसीम कुरेशी
नागपूर : शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या आऊटर रिंग राेडच्या कामात कंत्राटदार कंपनीला दोनवेळा सवलत देऊनही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता नव्या कंत्राटाची तयारी सुरू असून, कंपनीला टर्मिनेशन नोटीस देण्यात आली आहे.
प्रत्यक्षात हे काम जुलै-२०१९ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र एमईपीडीएल या कंत्राटदार कंपनीचे काम मंदगतीने असल्याने बराच विलंब झाला. यामुळे नॅशनल हायवे ॲथाॅरिटी ऑफ इंडिया(एनएचएआय)ने सहा महिन्यापूर्वीच कंत्राटदार कंपनीला टर्मिनेशन नाेटीस दिली होती. याचा कालावधी आता ऑगस्टमध्ये संपत असल्याने एनएचएआयने कामासाठी नव्याने निविदा काढण्याची तयारी चालविली आहे.
एकूण ११९ किलोमीटर लांबीच्या आऊटर रिंग रोडमधील (ओआरआर) उर्वरित ६२ किलोमीटरच्या भागात जामठा ते फेटरी(पॅकेज-१) आणि फेटरी ते धारगाव (पॅकेज-२)पर्यंत दोन भागात विभागणी केली आहे. पॅकेज-१ मध्ये ५६ टक्के आणि पॅकेज-२ मध्ये ४२ टक्के काम पूर्ण झाले आहे. फोर लेन असलेला ओआरआरचा मार्ग काँक्रिटने तयार केला जात आहे. मागील सहा महिन्यात मंदगतीने काम सुरू आहे. प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी असणारे हे कंत्राट सुमारे ५०० कोटी रुपयांचे असेल, असा अंदाज आहे. दोन वर्षातील विलंबामुळे प्रकल्पाची किंमत दुप्पट झाल्याचे दिसत आहे.
प्रकल्पातील गुंतवणूक
प्रकल्पाची एकूण किंमत : ५३१ कोटी
- कंत्राटदार कंपनी : ७९.६९ कोटी
- एनएचएआय : २१४.४० कोटी
- बँक कर्ज : २३८.९३ कोटी
- आतापर्यंत खर्च : ४९८.२ कोटी
...
कोट
एनएचएआय मुख्यालयाच्या निर्देशानुसारच सहा महिन्यापूर्वी बँकेला टर्मिनेशन नोटीस दिली होती. नव्या कंत्राटासाठी बँकसुद्धा विकल्प (बॅलेन्स सब्स्टीट्यूट) निश्चित करू शकते. बँक टेंडर करणार नसेल तर एनएचएआय नवे टेंडर काढेल.
- राजीव अग्रवाल, क्षेत्रीय अधिकारी, एनएचएआय, नागपूर
...
प्रकल्प आराखडा १९ वर्षांपूर्वीचा
पीडब्ल्यूडीने २००० मध्येच या कामासाठी आराखडा तयार केला होता. मात्र काम करता आले नाही. जमीन आधीपासूनच अधिग्रहित करून ठेवल्याने एनएचएआयला काम करताना अडचण आली नाही. आराखड्यात किरकोळ सुधारणा करून मंजुरी दिल्यावर ४२ किलोमीटर लांबीचा रिंग रोड तयार झाला. सुधारणेनंतर उर्वरित ६२.०३५ किलोमीटरचे काम जानेवारी-२०१७ पासून सुरू झाले.