लाेकमत न्यूज नेटवर्क
खात/रेवराल : रेल्वे फाटकाजवळील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी खात (ता. माैदा) येथे रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ते काम नियाेजित काळात पूर्ण करण्यात आले नाही. शिवाय, या कामासाठी तयार करण्यात आलेल्या वळण मार्गावरील चिखलामुळे वाहनचालकांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागताे. यात कंत्राटदार कंपनी मनमानी कारभार करीत असल्याचा आराेप नागरिकांनी केला असून, हे काम डाेकेदुखी ठरत असल्याचे सांगितले.
खात जवळील रेल्वे फाटक मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असून, येथे रामटेक-खात-भंडारा मार्ग रेल्वे मार्गाला छेदून गेला आहे. पुढे हा मार्ग नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाला जाेडला असल्याने या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. रेल्वेफाटकाजवळील वाहतूक काेंडीची समस्या साेडविण्यासाठी रेल्वे प्रशासन व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी ‘रेल्वे ओव्हरब्रिज’ मंजूर करून त्याला पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे या कामाचे कंत्राट बंका कन्स्ट्रक्शन कंपनीला देत कंपनीने कामाला सुरुवातही केली.
उपाययाेजनांच्या अभावामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याबाबत कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यास ते असभ्य वक्तव्य करीत असल्याचा आराेपही नागरिकांनी केला आहे. या रेल्वे ओव्हरब्रिजचे काम सुमार दर्जाचे आहे, असा आराेप काही जाणकार व्यक्तींनी केला असून, यात अधिकारी व कंत्राटदार कंपनी यांचे संगनमत असल्याचेही त्यांनी सांगितले. या गंभीर प्रकाराकडे स्थानिक लाेकप्रतिनिधी मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या कामाच्या गुणवत्तेची निरपेक्ष चाैकशी करून त्यात सुधारणा न केल्यास आंदाेलन करण्याचा इशारा परिसरातील गावांमधील नागरिकांनी दिला आहे.
....
अपघातांचे प्रमाण वाढले
या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिज जवळ वळण मार्ग तयार करण्यात आला. त्या वळण मार्गाचे डांबरीकरण केले नसून, त्यावर केवळ मातीमिश्रित मुरुम टाकण्यात आला आहे. पावसाळा सुरू हाेताच त्या मातीचा चिखल तयार झाला आहे. शिवाय, त्यावर खड्डेही तयार झाले आहेत. या चिखलामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात हाेत आहेत तर चारचाकी वाहनांमुळे चिखल व डबक्यांमधील गढूळ पाणी अंगावर उडत असल्याने व कपडे खराब हाेत असल्याने नागरिकांना मनस्तापही सहन करावा लागत आहे.
...
उपाययाेजनांचा अभाव
या ठिकाणी वळण मार्गावर कंत्राटदार कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीने काेणत्याही उपाययाेजना केल्या नाहीत. या ठिकाणी साधे दिशादर्शक फलकही लावण्यात आले नाही. त्यामुळे नवीन वाहनचालकांची माेठी गैरसाेय हाेत असून, ती गैरसाेय अपघातास कारणीभूत ठरत आहे. चारचाकी वाहन राेडलगतच्या नालीत शिरल्याने वाहनातील चाैघे जखमी झाल्याची घटना येथे नुकतीच घडली आहे. काही दिवसांपूर्वी एक चारचाकी वाहन चक्क राेडलगतच्या दुकानात शिरले हाेते.
...
या रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला वेग द्यावा. वळण मार्ग चिखलमय असल्याने नागरिकांना त्रास हाेताे. त्यामुळे यात सुधारणा करावी. या कंपनीचे अधिकारी लाेकप्रतिनिधी व नागरिकांशी उर्मटपणे बाेलत असल्याने त्यांनी मनमानी थांबावावी व त्यांना साैजन्याने वागण्याची समज द्यावी.
- ज्योती डहाके,
सरपंच, खात.
...
या रेल्वे ओव्हरब्रिजचे काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही बाजूचा रस्ता तयार करणार नाही. या संदर्भात नागरिक कुणाकडेही तक्रार करू शकतात. याबाबत नागरिकांनी आपल्याला न सांगता सरकाच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सांगावे.
- विकासकुमार वंतस,
साईड इंजिनिअर.