आशिष साैदागर
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : शहरालगतच्या कळमेश्वर-काटाेल मार्गावर असलेल्या रेल्वे फाटकाजवळील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला सुरुवात करण्यात आली. कामाच्या अतिशय संथ वेगामुळे हा रेल्वे ओव्हरब्रिज दीड वर्षानंतरही पूर्णत्वास गेला नाही. या ठिकाणी वाहनांची वर्दळ सुरू असून, येथे खाेल खड्डे, त्यात साचलेले पावसाचे पाणी व चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. हा १५० मीटरचा प्रवास जीवघेणा असल्याने हा रेल्वे फ्लायओव्हर सध्यातरी डाेकेदुखी ठरत आहे.
नागपूर-काटाेल-वरुड-माेर्शी-अमरावती हा राज्यमार्ग कळमेश्वर शहरातून गेला आहे. हा मार्ग चेन्नई-नागपूर-दिल्ली रेल्वेमार्गाला छेदून गेल्याने कळमेश्वर शहरालगत या मार्गावर दाेन तर कळमेश्वर-गाेंडखैरी मार्गावर एक, असे तीन रेल्वे फाटक आहेत. या रेल्वेेमार्गावर प्रवासी व मालगाड्यांचे प्रमाण अधिक असल्याने हे तिन्ही रेल्वे फाटक दर १५ मिनिटाला बंद हाेतात. नागपूर-अमरावती व कळमेश्वर-गाेंडखैरी हे दाेन्ही मार्ग वर्दळीचे असल्याने, या तिन्ही फाटकाजवळ वाहतूक काेंडी हाेते.
ही वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी नागपूर-अमरावती मार्गावरील दाेन्ही रेल्वे फाटकाजवळ महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन लिमि.(महारेल)ने रेल्वे ओव्हरब्रिजच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. यात कळमेश्वर-नागपूर मार्गावरील फाटकाजवळचा राेड थाेडा शाबूत आहे. मात्र, कळमेश्वर-काटाेल मार्गावरील फाटकाजवळील राेड खड्डे, डबके व चिखलात गडप झाला आहे. हे खड्डे बुजवून १५० मीटरचे डांबरीकरण करण्याचे औदार्यही प्रशासन दाखवायला तयार नाही.
...
आठ महिन्यापूर्वीच मुदत संपली
महारेलने या कामाचे कंत्राट एमबीपीसी-केईसी नामक कंपनीला दिले आहे. या रेल्वे ओव्हरब्रिजची किंमत २४ काेटी ५२ लाख १० हजार ६३२ रुपये ठरविण्यात आली. कंत्राटदाराने या कामाला ६ डिसेंबर २०१९ पासून सुरुवात केली. या रेल्वे ओव्हरब्रिजचे पूर्ण काम ३६० दिवसामध्ये पूर्ण करणे अपेक्षित हाेते. मात्र, ही मुदत संपून आठ महिने अधिक झाले. मात्र, या काळात रेल्वे ओव्हरब्रिजचे केवळ ४० टक्के काम करण्यात आले.
...
१५० मीटरचा जीवघेणा प्रवास
या रेल्वे ओव्हरब्रिजची लांबी ५३८.४९ मीटर आहे. या फाटकाजवळ १५० मीटरच्या राेडवर अगणित खड्डे तयार झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचले आहे. वाहनांच्या चाकांमुळे आलेल्या मातीचा माेठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. येथून मार्गक्रमण करताना डबक्यांमुळे खड्ड्यांच्या खाेली व रुंदीचा वाहनचालकांना अंदाज येत नाही. वाहनांच्या चाकांमुळे चिखल उडत असल्याने मनस्ताप सहन करावा लागताे. दुचाकीचालकांसाठी हा १५० मीटरचा प्रवास जीवघेणा ठरत आहे.