वाडी: नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गाला जोडलेल्या वाडी-खडगाव सिमेंट रस्त्याचे बांधकाम मागील दीड वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असले तरी कामात अनेक त्रुटी आहेत. मात्र हा रस्ता रहदारीस सुरू करण्यात आल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वाडी नगर परिषद ते लाव्हा ग्राम पंचायत हद्दीत जवळपास ४ ते ५ किलोमीटरच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहून जाण्यासाठी मोठ्या भूमिगत नालीचे बांधकाम करण्यात आले. याच नालीवर पायी चालणाऱ्यासाठी फूटपाथ तयार करण्यात आले. नालीवरील अनेक चेंबर्सला झाकण लावलेले नाही तर जिथे झाकण लावलेले आहे ते निकृष्ट दर्जाचे आहेत. फूटपाथवर लावलेले गट्टू बाहेर निघाले असून काही नाल्याचे अजूनही काम अर्धवट अवस्थेत आहे. लाव्हा ते वाडी दरम्यान रस्त्यावर जवळपास ५० लोखंडी व सिमेंटचे विजेचे खांब आहे. यातील काही खांब वाकलेल्या अवस्थेत आहे. रस्त्याच्या मधोमध मोठे वृक्ष आले असून रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार पसरला असल्याने सुसाट वेगाने गाडी चालविणारा वाहक केंव्हाही धडक देऊ शकतो. मंगळवारी झालेल्या पावसामुळे मुख्य रस्त्यावरील पाणी जाण्याला मार्ग नसल्याने रस्त्यावर पाणी साचून डबके तयार झाले होते. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही.
उपरोक्त समस्या अथवा भविष्यात निर्माण होणारी संभाव्य दुर्घटना पाहता संबंधित विभागाने जातीने लक्ष घालून कंत्राटदाराकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी कामे पूर्ण करून घ्यावी तसेच स्थानिक लाव्हा ग्राम पंचायत व वाडी नगर परिषद प्रशासनाने याचा पाठपुरावा करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.