लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना, शिफारशींवर १०० टक्के अंमलबजाावणी व्हावी, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी डीपीसीच्या बैठकीत दिले. त्यांनी यासंदर्भात पुढच्या बैठकीत अहवाल सादर करण्यासही सांगितले.
पालकमंत्री राऊत यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सर्व विभागप्रमुखांना हे निश्चित करण्यास सांगितले की, प्रत्येक विभागाने आपले लक्ष्य पूर्ण करावे. जिल्हा नियोजन समितीची सभा पुढच्या महिन्यात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी अनुपालन रिपोर्ट, नवीन वर्षासाठीचे प्रस्ताव, जिल्हा वार्षिक योजना, २०२१-२२ च्या प्रारुपसारख्या विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रत्येक अर्थसंकल्पीय तरतुदींवर चर्चा झाली. पुढील तीन महिन्यात निधी खर्च करण्याबाबत विभागवाार चर्चा करण्यात आली. बैठकीत असे सांगण्यात आले की, कोरोनामुळे मार्चपासून अनेक कामे प्रभावित झाली आहेत. आता उर्वरित वेळेत निधी खर्च करण्यावर मंथन झाले. यापूर्वी २० जानेवारी २०२० रोजी झालेल्या बैठकीचे अनुपालन रिपोर्ट सुद्धा सादर करण्यात आला. यावर पालकमंत्र्यांनी १०० टक्के अनुपालन रिपोर्ट सादर करण्यास सांगितले.
बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर उपस्थित होते.