बुटीबाेरी : कंपनीतील चेअर मोल्ड मशीनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने कंत्राटी कामगाराने ती दार बंद करून साफ करायला सुरुवात केली. त्यातच शिफ्ट सुपरवायझरने ती मशीन सुरू केली आणि कामगार मशीनमध्ये दबल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी एमआयडीसी परिसरात मंगळवारी (दि. २३) सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
राजेंद्र अंजीलाल कटरे (२७, रा. बालाघाट, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे. ताे बुटीबाेरी एमआयडीसी परिसरातील प्लास्टिक तयार करणाऱ्या कंपनीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करायचा. त्यामुळे ताे चार वर्षांपासून याच एमआयडीसी परिसरात राहायचा. ताे रात्री १२ ते सकाळी ८ या शिफ्टमध्ये कामावर हाेता. सकाळी कंपनीतील चेअर मोल्ड मशीनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने त्याने त्या मशीनची साफसफाई करायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने दार बंद केले हाेते.
ताे आत काम करीत असतानाच शिफ्ट सुपरवायझरने कुठलीही शहानिशा न करता मशीन सुरू केली. मशीन सुरू हाेताच राजेंद्रचे डाेके मशीनमध्ये अडकले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविला. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी जितेंद्र अंजीलाल कटरे यांच्या तक्रारीवरून शिफ्ट सुपरवायझर पवन ढाेबळेविरुद्ध भादंवि २८७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक दिनकर दराडे करीत आहेत.