नागपूर : धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत स्फोट झाल्याच्या कारणांचा अद्यापही शोधच घेण्यात येत आहे. येथे पाचशे किलो बारूद व वातींमध्ये कामगार काम करत असतानादेखील त्यांच्या सुरक्षेबाबत कंपनीकडून हव्या तशा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. पॅकेजिंग युनिट व परिसरात आवश्यक सुरक्षा प्रणाली तर नव्हतीच, शिवाय अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणादेखील नसल्याची बाब समोर आली आहे. मृतांच्या कुटुंबियांकडून देखील हाच आरोप करण्यात आला आहे.
‘लोकमत’ने यासंदर्भात कंपनीतील कर्मचारी, अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. फटाक्यांसाठी लागणाऱ्या वाती, सेफ्टी फ्युजेस व मायक्रोकॉर्ड बनविण्याचे काम या कंपनीकडून करण्यात येत असल्याने येथे ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणात होते. मशीनने सेफ्टी फ्युजेस व मायक्रोकॉर्ड तयार झाल्यावर महिला व कामगारांकडून त्याचे पॅकेजिंग करण्यात यायचे. तसे पाहिले तर एका अर्थाने लहानशी ठिणगीदेखील तेथे सर्व स्वाहा करण्यासाठी पुरेशी होती, याची सगळ्यांनाच जाणीव होती. मात्र कंपनीकडून कामगारांना आवश्यक सुरक्षा प्रणाली पुरविण्यात आली नव्हती. तसेच अग्निशमन यंत्रणादेखील हवी तशी नव्हती. त्यामुळेच स्पार्किंग झाल्यावर लगेच आग विझण्याऐवजी तेथे मोठा स्फोट झाला.परिसरात एकही रुग्णवाहिका नव्हती
मृत मशीन ऑपरेटर पन्नालाल बंदेवार यांचा मुलगा अनुरागने देखील कंपनीकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा केला आहे. स्फोटकांच्या ढिगाऱ्यावर सर्व लोक काम करत असताना परिसरात साधी रुग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आली नव्हती. कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.कामगारांना प्रशिक्षणाच्या नावाखाली फार्स
स्फोटकांशी निगडित कंपनीत प्रशिक्षित कर्मचारी काम करणे अपेक्षित असते. तसेच तेथे सातत्याने कामगारांसाठी प्रशिक्षण वर्ग घेणेदेखील आवश्यक असते. या कंपनीत पॅकेजिंगसाठी आजूबाजूच्याच गावातील तरुणी, महिलांना कामावर ठेवण्यात आले होते. त्यांना याबाबतीत फारसे तांत्रिक ज्ञानदेखील देण्यात आले नव्हते. प्रत्यक्ष उत्पादनात जरी ते सहभागी नव्हते तरी त्यांना तांत्रिक ज्ञान व धोक्याची जाणीव करून देणे आवश्यक होते. मशीन ऑपरेटरचे काम झाल्यावर या तरुणी व महिला पॅकेजिंग करायच्या. मात्र बहुतांश जणांना सुरक्षेच्या उपायांची सखोल माहितीच देण्यात आली नव्हती.पॅकेजिंग युनिटकडे दुर्लक्ष कसे ?
येथे मशीनच्या माध्यमातून मायक्रोकॉर्ड तयार व्हायच्या व पॅकेजिंग होत होते. एका बॉक्समध्ये पाच हजार मीटरची कॉर्ड असायची. या कॉर्डला ५० विविध बंडलमध्ये वेगवेगळे ठेवण्यात यायचे. याचे पॅकेजिंग महिला करायच्या. अतिशय ज्वलनशील पदार्थांमध्ये या कॉर्डचा समावेश होत होता. इतका धोका असतानादेखील पॅकेजिंग युनिटकडे दुर्लक्ष कसे काय झाले, असा सवाल निर्माण होत आहे.
‘पेसो’ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय
कंपनीने पॅकेजिंग युनिटमध्ये नियमित मॉकड्रील होत होती असा दावा केला आहे. ‘पेसो’च्या अधिकाऱ्यांकडून नियमितपणे चाचपणी व्हायची असेदेखील सांगण्यात आले. मात्र ‘पेसो’मधील गैरप्रकार काही महिन्यांअगोदर समोर आले होते. पैशांच्या बदल्यात क्षमतावाढ करण्याच्या मुद्द्यामुळे पेसोमध्ये खळबळ उडाली होती. त्यामुळे पेसोच्या अधिकाऱ्यांनी खरोखरच फिल्ड व्हिजिट केली होती की केवळ कागदोपत्रीच कार्यवाही करण्यात आली, असा सवाल नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.