हप्ता वसुलीतून घडली घटना : अर्धा तास सुरू होती मारहाणनागपूर : जरीपटक्यातील बाराखोली परिसरात गुन्हेगारांनी हप्ता वसुलीसाठी एका गरीब कामगाराला मारहाण करून त्याचा खून केला. घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राकेश बापूराव रामटेके (४५) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी सूरज मानवटकर (२५), विश्वास ऊर्फ गुड्डु दहिवले (२५), कमलेश ऊर्फ काम्या पाटील (३०) यांना अटक केली आहे.राकेश मजुरी करीत होता. त्याच्या कुटुंबात पत्नी वैशाली, मुलगा अभय आणि मुलगी प्रियंका आहे. अभय आयटीआय करीत असून, प्रियंका बी.कॉम.च्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. आरोपी सूरज आणि विश्वास गुन्हेगारीवृत्तीचे आहेत. त्यांची बाराखोली परिसरात दहशत आहे. काही दिवसांपासून ते राकेशला कामावरून परत येताना थांबवून दारूसाठी पैसे मागत होते. आरोपींची दहशत असल्यामुळे राकेशने अनेकदा त्यांना ५० ते १०० रुपये दिले. यामुळे आरोपींचे मनसुबे वाढले. आरोपी दररोज पैसे मागू लागल्याने राकेशने आपला रस्ता बदलवून घरी जाणे सुरू केले. याची माहिती मिळताच मंगळवारी रात्री ११.३० वाजता आरोपी राकेशच्या घरी पोहोचले. त्यांनी राकेशला आवाज दिला. राकेश बाहेर आल्यानंतर तिन्ही आरोपींनी त्याला घेरून पैशाची मागणी केली. घरी पत्नी आणि मुलगी असल्यामुळे राकेशने आरोपींना अशा पद्धतीने घरी येण्याबाबत आक्षेप नोंदविला. यामुळे चिडून आरोपींनी राकेशला लाठी आणि लोखंडी रॉडने मारहाण सुरू केली. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून राकेशची पत्नी वैशाली आणि मुले मदतीसाठी धावले. ते राकेशला सोडून देण्याची विनवणी करीत होते. वस्तीतील नागरिकही गोळा झाले. आरोपींनी लाठी उगारून वैशाली आणि तिच्या मुलांना घरात जाण्यास सांगितले. थोडी फार मारहाण करून पतीला सोडून देतील, असा विचार करून वैशाली मुलांसह घरात गेली. त्यानंतर आरोपी राकेशवर तुटून पडले. वैशालीने या घटनेची पोलिसांना माहिती दिली. तिने घराबाहेर येऊन पुन्हा आरोपींना विनवणी केली. त्यानंतर आरोपींनी वैशाली आणि वस्तीतील नागरिकांना मारण्याची धमकी देऊन घरात जाण्यास सांगितले. अर्धा तास राकेशला ते मारहाण करीत होते. राकेश बेशुद्ध झाल्यानंतर ते फरार झाले. त्यानंतर वस्तीतील नागरिकांनी राकेशला मेयो रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. (प्रतिनिधी)उशिराने पोहोचले पोलीसराकेशच्या पत्नीने सूचना देऊनही जरीपटक्यातील दोन पोलीस शिपाई अर्ध्या तासाने घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलीस वेळीच पोहोचले असते तर राकेशला वाचविता आले असते, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यात नागरिकांनीही आरोपींना थांबविण्याची किंवा समजविण्याची हिंमत केली नाही. उपासमारीची वेळघटनेमुळे राकेशची पत्नी आणि मुलांवर उपासमारीची पाळी आली आहे. मुलांना उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न राकेशने पाहिले होते. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांचे उपजीविकेचे साधन उरले नाही.
कामगाराचा खून
By admin | Published: October 01, 2015 3:10 AM