नागपूर : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे नागपुरातील अनेक लहानमोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे बांधकाम थांबले आहे. कडक लॉकडाऊन आणि सीमा सील करण्याच्या भीतीने मजुरांनी आधीच पलायन करायला सुरुवात केली आहे. काही प्रकल्पात निवासी असलेले कामगार स्वगृही परत न जाता काम करीत आहेत. पण अशी संख्या फार कमी असून सध्या नागपुरातील बांधकाम क्षेत्र संकटात आले आहे.
अनेक प्रकल्पातील फ्लॅटची कामे मंदावल्याने ग्राहकांना घराचा वेळेत ताबा देण्यास अडचणी येत आहेत. रेराच्या नियमानुसार निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करून लोकांना घराचा ताबा देणे बंधनकारक आहे. अशा संकटाच्या स्थितीत रेराच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून वेळ वाढविण्यासाठी क्रेडाई नागपूर मेट्रो प्रयत्नरत आहे. कोरोनामुळे साखळी तुटल्याने अनेकांना भांडवलाची टंचाई भासत आहे. कामे बंद झाल्याने बँकांकडे अतिरिक्त निधीची मागणी कुणीही करीत नसल्याची माहिती आहे.
बिल्डर्स म्हणाले, गेल्यावर्षी कोरोनामुळे आलेल्या मंदीतून अद्याप कुणीही बाहेर आले नाही. राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केल्यानंतर फ्लॅट, प्लॉट आणि घरविक्री वाढली होती. पण पुन्हा कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. फ्लॅट खरेदी वा विचारपूस करण्यासाठी ग्राहक बिल्डरच्या कार्यालयात पोहोचत नाहीत.
गेल्यावर्षी ऑक्टोबरनंतर मजूर कामावर परतले होते. दिवाळीनंतर सर्व प्रकारच्या बांधकामाला वेग आला होता. पण त्यापूर्वी अनलॉकमध्ये बांधकाम साहित्यांचे दर वाढले होते. त्यानंतरही बांधकाम वेगात सुरू झाले. पण एप्रिल महिन्यात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मजुरांनी स्वगृही पलायन सुरू केले. त्यामुळे बांधकाम अर्धवट थांबले आहेत. मजूर परतल्याने कंत्राटदारही संकटात आले आहेत. त्यामुळे ते बिल्डरांना काम करण्यास नकार देत आहेत. लोखंड, सळाख, सिमेंट, रेती, गिट्टी आणि अन्य साहित्य महाग झाल्याने बांधकामाचे बजेट वाढले आहे. त्यातच कोरोना संकटाने त्या पुन्हा भर टाकली आहे.
राज्य शासनाच्या मुद्रांत शुल्क कपातीनंतर घराचे बुकिंग वाढले होते. त्यामुळे बिल्डरांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. बुकिंग वाढल्याने त्यांनीही कामाचा वेग वाढविला होता. वेळेच्या आता घराचा ताबा देण्यासाठी ते धडपड करीत होते. पण आता काम बंद झाल्याने त्यांचीही चिंता वाढली आहे. ग्राहकांना दिलेल्या वेळा पाळणे बिल्डरांना कठीण झाले आहे. याशिवाय एक प्रकल्प पूर्ण करून दुसरा सुरू करण्याच्या स्वप्नाचा चुराडा झाला आहे. त्यामुळे अनेक बिल्डरला नुकसान सोसावे लागत आहे. आता पुन्हा कोरोनाचे संकट जाण्याची वाट बिल्डरांना पाहावी लागणार आहे.
मटेरियल नाही, काम ठप्प
मजूर स्वगृही परतले आहेत. शिवाय प्रकल्पावर मटेरियल नसल्याने बांधकाम ठप्प झाले आहेत. हीच स्थिती नागपुरातील बहुतांश प्रकल्पाची आहे. कोरोनाचे संकट केव्हा जाणार आणि मजूर केव्हा येतील, याची प्रतीक्षा आहे. बांधकाम बंद पडल्याने आता रेरासोबत लढावे लागणार आहे. एकूणच बिल्डर संकटात आहेत.
विजय दर्गन, अध्यक्ष, क्रेडाई नागपूर मेट्रो
फ्लॅटचा ताबा देण्यास अडचणी
बांधकाम थांबल्याने ग्राहकांना फ्लॅट वा घराचा ताबा देण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. दिवाळीनंतर बांधकाम क्षेत्रात उत्साहाचे वातावरण होते. पण पुन्हा कोरोनाने उत्साहावर विरजन पडले आहे. गृहनिर्माण कार्य केव्हा सुरू होईल, हे सांगणे कठीण आहे. कोरोनामुळे बिल्डरांना संकटाचा सामना करावा लागत आहे.
महेश साधवानी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र क्रेडाई मेट्रो.