लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोराडी औष्णिक वीज केंद्रातील बंद झालेल्या चार युनिटपैकी दोन युनिटच्या चिमण्या सोमवारी जमीनदोस्त करण्यात आल्या. चिमणी कोसळताना त्यातील एक दगड अवघ्या २०० मीटरवर उभ्या असलेल्या एका कंत्राटी कामगाराला लागला. त्यात तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास घडली.
कोराडी औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक एक ते चार मधील उत्पादन बंद झालेले आहे. ४० वर्षे जुन्या असलेल्या १०५ मेगावॅट क्षमतेच्या या युनिटला हटविण्याचे काम सध्या सुरू आहे. याअंतर्गत सोमवारी विशेषज्ञ संस्थेच्या माध्यमातून यापैकी दोन चिमण्या पाडण्यात आल्या. ७२ मीटर उंच असलेल्या या चिमण्या कोसळताना ३० मीटरचा परिसर खाली करण्यात आला होता. बॅरिकेड्स लावून गार्ड तैनात करण्यात आले होते. अॅम्ब्युलन्सही तयार ठेवण्यात आली हेती. परंतु चिमणी कोसळताना ही घटना घडली.
चिमणीतील एक दगड उडून २०० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या टोरचा कंत्राटी कामगार दिनू काकडे याच्या डोक्याला लागला. सुपरवायझरच्या पदावर तैनात असलेला काकडे यात जखमी झाले. त्यांना मानकापूर येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. वीज केंद्रातील मुख्य अभियंता राजकुमार तासकर यांनी सांगितले की, काकडे यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांची कोविड-१९ ची टेस्टही करण्यात आली आहे.