नागपूर: मजूरांनी स्वत:ची लढाई स्वत:च लढली पाहिजे. त्याकरिता त्याने शिक्षित व्हावे आणि आपल्या पाल्यालाही इंग्रजी भाषेचे ज्ञान देऊन शिक्षित करावे. न्याय्य मागण्यांसाठी मजूरांनी युनियनच्या माध्यमातून एकत्रित लढा देण्याची गरज असल्याचे मत हैदराबादचे सामाजिक विचारवंत आणि लेखक प्रा. कांचा लाया यांनी येथे केले. स्वतंत्र मजदूर युनियनचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात शनिवारपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या उद्घाटनपर सत्रात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. भारतातील मजूरांमध्ये सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्रांती घडविण्यासह मजूरांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे लाया यांनी स्पष्ट केले.
व्यासपीठावर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील, उपाध्यक्ष डॉ. के.पी. स्वामीनाथन, दिल्ली विद्यापीठाचे असोसिएट प्रा. डॉ. सूरज मंडल, नवी दिल्लीचे डी.सी. कपील, युनियनचे पदाधिकारी ए.व्ही. किरण, एफ.सी. जस्सी, डॉ. दिनेश निबरिया, रमेश मेढी, महेश चंद्रा. एस.के. सचदेव, सुभाषिणी, सागर तायडे उपस्थित होते. प्रा. कांचा लाया म्हणाले, संघटित आणि असंघटित मजूरांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागतो. पण या मजूरांचा आदर होत नाही. ही शोकांतिका आहे. आधी मजूरांच्या हक्कांचे नेतृत्त्व करणाऱ्या कम्युनिष्टांमध्येही ब्राह्मणांना मोठे स्थान होते. त्यांच्या काळातही मजूरांचा छळ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पेरियार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मजूरांनी पाल्यांना शिक्षित करण्याची गरज आहे. या लढ्याच्या माध्यमातून त्यांचे स्थान सुदृढ होईल.
डॉ. सूरज मंडल म्हणाले, खासगीकरणामुळे कामगारांचे शोषण आणि बेरोजगारांची संख्या वाढली आहे. सामाजिक सुरक्षा नाहीच. आरक्षण संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाला गरीब बनविले जात आहे. डॉ. आंबेडकरांनी देशाला ताकद दिली. सत्ताधाऱ्यांकडून ती संपविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संविधान बदलून मनुस्मृति पुन्हा लादण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हक्क अबाधित राखण्यासाठी मजूरांनी आंदोलनाच्या माध्यमातून लढा उभारावा. स्वतंत्र मजदूर युनियन सत्ताधाऱ्यांचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही. नरेंद्र जारोंडे यांनी प्रास्तविक केले तर राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील यांनी आभार मानले. यावेळी स्वतंत्र मजदूर युनियनशी संबंधित विविध संघटनांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.