लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : गांधीसागर तलावानजीक असलेल्या न्यू आयडियल हायस्कूल या मुला-मुलींच्या शाळेसमोरच कामगारांच्या झोपड्यांचे बस्तान बसल्याने विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सोसावा लागत आहे. सुमारे ४० कामगारांचा ठिय्या याठिकाणी वास्तव्याला असून, मोठ्या क्रेन, वाहने यामुळे विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
शहरात भूमिगत वीज वाहिनीचे काम सुरू झाले आहे. याकरिता या परिसरात आठवड्यापासून कामगार आले आहेत. संपूर्ण साहित्यसुद्धा याच परिसरात पसरविण्यात आले आहे. सध्या नववी व दहावीचे वर्ग सुरू आहेत. अशावेळी दिवसभर क्रेन व वाहनांच्या कर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषणाचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. शिक्षकांनाही यामुळे व्यत्यय येत असून, तातडीने कामगारांच्या झोपड्या हटविण्याची मागणी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञा. शि. ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.
शिवाय, याच परिसरात धुणीभांडी, अंघाेळ, शौचविधीचा कार्यक्रमसुद्धा पार पाडत असल्याने अस्वच्छतेची बाबही प्रकर्षाने दिसून येत असल्याचा आरोप मुख्याध्यापकांनी नगरपालिकेला दिलेल्या पत्रात केला आहे. वाहनांची दिवसभर ये-जा सुरू असते. शिवाय क्रेनच्या माध्यमातून वायर आणि अन्य जड साहित्याची उचल केली जाते. अशावेळी अनवधानाने अपघात झाल्यास यास जबाबदार कोण, असा सवालही विचारला जात आहे.
.....
ध्वनिप्रदूषण व अस्वच्छता यामुळे विद्यार्थी-शिक्षक त्रस्त झाले आहेत. शिवाय शाळेत विद्यार्थिनी असल्याने अधिक काळजी वाटते. याबाबतची समस्या मांडण्यासाठी अधिकाऱ्यांकडे गेलो असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
- महेश तवले, सचिव,
आयडियल एज्युकेशन सोसायटी, उमरेड