लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात येत्या सप्टेंबरमधील विशिष्ट दिवशी न्यायमूर्ती व वकिलांच्या शारीरिक उपस्थितीमध्ये कामकाज केले जाणार आहे. याकरिता सध्या १५ सप्टेंबरपर्यंत कामकाजाचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, नियमांचे पालन व्हावे यासाठी मर्यादित प्रकरणांवरच सुनावणी घेतली जाणार आहे.याविषयी गुरुवारी नोटीस जारी करण्यात आली. त्यानुसार, २ व ७ सप्टेंबर रोजी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांचे न्यायपीठ सम वर्षांतील दिवाणी रिट याचिका, दिवाणी जनहित याचिका, लेटर्स पेटेन्ट अपील्स, १५ सप्टेंबर रोजी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांचे न्यायपीठ विषम वर्षांतील दिवाणी रिट याचिका, फौजदारी जनहित याचिका, सम वर्षांतील फौजदारी रिट याचिका, ९ व ११ सप्टेंबर रोजी न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व नितीन सूर्यवंशी यांचे न्यायपीठ प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर आणि कस्टम अर्ज, संदर्भ व अपील्स, प्रथम अपील्स, कुटुंब न्यायालय अपील्स, अवमानना अपील्स व याचिका, न्या. रोहित देव हे नियमित जामीन व अटकपूर्व जामीन अर्ज, विषम वर्षांतील फौजदारी रिट याचिका, सीआरपीसी कलम ४०७ अंतर्गतचे अर्ज तर, ८ व १४ सप्टेंबर रोजी न्या. मनीष पितळे हे सर्व दिवाणी रिट याचिका, दिवाणी व फौजदारी रिव्हिजन अर्ज आणि न्या. विनय जोशी हे सर्व फौजदारी अपील्सवर सुनावणी घेतील. याशिवाय निर्धारित कार्यक्रमानुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पद्धतही सुरू राहणार आहे. शारीरिक उपस्थितीतील सुनावणीदरम्यान शारीरिक अंतर ठेवणे, मास्क लावणे व सॅनिटायझरचा उपयोग करणे बंधनकारक राहणार आहे. शारीरिक उपस्थितीत सुनावणी करायची नसलेल्या वकिलांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय वापरता येणार आहे.
हायकोर्टात सप्टेंबरमध्ये शारीरिक उपस्थितीत कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:28 AM