लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी म्हणूनच जगले. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या बाबासाहेबांनी ज्ञानाची भूक भागविण्यासाठी प्रसंगी मिळेल ते कष्ट उपसले. विविध विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन करणाऱ्या या महामानवाने त्या ज्ञानाचा उपयोग अस्पृश्यता निवारणासह देशाच्या विकासासाठी केला. विश्वानेही त्यांची विद्वत्ता स्वीकारली. म्हणूनच हा ज्ञानाचा महासागर विद्यार्थी व तरुणांसाठी कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना तरुण अभ्यासकांनी व्यक्त केली.विद्यार्थ्यांसाठी कायम प्रेरणादायीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाप्रतिचे प्रेम आणि सतत काहीतरी शिकण्याचा स्वभाव यामुळे ते कायम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी राहतील. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रमुख साधन होय, असे ते मानायचे. तुम्ही उच्च शिक्षित झाले तर प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख निर्माण होईल, मात्र शिक्षणासोबतच त्यांनी शील या गुणास महत्त्व दिले होते. अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था सुरू केल्या, अनेक मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविले. त्यांच्या अनेक कार्यांपैकी शिक्षणासाठी केलेले त्यांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहिल.अम्रपाली हाडके, अभियांत्रिकी विद्यार्थीतेव्हाच होईल सर्वसमावेशक विकासबाबासाहेबांनी दिलेले संविधान आणि अनेक विषयावर केलेले लेखन हे त्यांच्या सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे. संविधानाच्या मूलतत्त्वाकडे सरकारांनी दुर्लक्ष केल्यास ही लोकशाही खोटी ठरेल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांनी तरुण, ज्येष्ठ नागरिक, कामगारांसह सामाजिक, आर्थिक आणि कृषिविषयक धोरण अमलात आणले तर भारत एक विकसित राष्ट्र म्हणून उदयास येऊ शकतो. बौद्ध धम्माचा स्वीकार केल्याने वंचित घटकांचा विकास होत असून यामुळे देशाच्याही विकासात भरच पडली आहे.डॉ. सिद्धांत भरणे, वैद्यकीय पदवीधरआम्ही घडलो, पुढच्या पिढ्या घडतीलबाबासाहेब आणि त्यांच्या धम्मक्रांतीमुळे हजारो वर्ष गुलामीत राहिलेल्या समाजाचा विकास झपाट्याने होत आहे. देशातील सर्वच घटकांसाठी आणि भारतीय महिलांच्या प्रगतीमध्ये त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. बाबासाहेब म्हणायचे, इतिहास माझ्या कार्याची निश्चितच दखल घेईल. त्यामुळे भविष्यात त्यांच्या कार्याची दखल घ्यावीच लागेल. अनेक धर्म, भाषेचे लोक असलेल्या देशाची लोकशाही मजबूत ठेवण्यात आणि त्यातून प्रगती साधण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे मान्य करावेच लागेल. त्यांच्यामुळेच आमची पिढी घडली आणि भविष्यातही अनेक पिढ्या घडत राहतील.विश्वास रंगारी, खासगी नोकरी.