राकेश घानोडे
नागपूर : देशात गेल्या अनेक वर्षांपासून एड्सविषयी जनजागृती केली जात आहे. असे असतानादेखील प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रामधील तब्बल १२ टक्के महिलांनी एड्सचे नावही ऐकलेले नाही. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यावरून एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या संपूर्ण यशाकरिता अजून प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील केवळ ८८ टक्के महिलांनी एड्सविषयी ऐकले आहे. त्यामध्ये शहरी भागातील ९३ तर, ग्रामीण भागातील ८५ टक्के महिलांचा समावेश आहे. शाळेत न गेलेल्या २८, प्रसार माध्यमे उपलब्ध नसलेल्या २१ आणि आदिवासी समाजातील २५ टक्के महिलांना एड्सविषयी काहीच माहिती नाही. याबाबतीत महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक आहे. राज्यातील ९५ टक्के पुरुषांनी एड्सविषयी ऐकले आहे. परंतु, एड्सविषयी सर्वांगीन ज्ञानाचा विचार केल्यास, परिस्थिती आणखी गंभीर आहे. एड्सचे सर्वांगीन ज्ञान केवळ ३४ टक्के महिला व ४३ टक्के पुरुषांनाच आहे.
प्रतिबंध व प्रसारणाविषयी अज्ञान
एड्स प्रतिबंध व प्रसारणाविषयीसुद्धा बरेच अज्ञान आहे. कंडोम वापरून एड्सला दूर ठेवता येऊ शकते हे २८ टक्के महिला व १५ टक्के पुरुषांना माहिती नाही. याशिवाय एकाच साथिदारासोबत संबंध ठेवून एड्सपासून बचाव केला जाऊ शकते हे २८ टक्के महिला व २२ टक्के पुरुषांना माहिती नाही.
एड्स चाचणीत पुरुष मागे
राज्यात एड्स चाचणी करणाऱ्यांचे प्रमाणही अत्यंत कमी आहे. यात महिलांच्या तुलनेत पुरुष मागे आहेत. या सर्वेक्षणापूर्वी १५ ते ४९ वयोगटातील केवळ ३५ टक्के महिला तर, १६ टक्के पुरुषांनी एड्स चाचणी केली होती.
एड्स रुग्णाची घरीच काळजी घ्यावी
एड्स रुग्णाची घरीच काळजी घ्यावी, असे ७५ टक्के महिला व ७९ टक्के पुरुषांनी सर्वेक्षणादरम्यान सांगितले. ७१ टक्के महिला व ७४ टक्के पुरुषांनी एड्सग्रस्त रुग्णाकडून भाजीपाला खरेदी करण्याची तयारी दर्शविली. ४८ टक्के महिला व ४६ टक्के पुरुषांनी कुटुंबातील सदस्याला एड्स झाल्यास, ही माहिती लपवून ठेवणार नाही असे स्पष्ट केले. ७९ टक्के महिला व ८० टक्के पुरुषांनी एड्सग्रस्त विद्यार्थ्यांना शाळेत बसू दिले पाहिजे, अशी भूमिका मांडली तर, एड्सग्रस्त कर्मचाऱ्याला कार्यालयात काम करू द्यावे, असे ७९ टक्के महिला व ७८ टक्के पुरुषांनी नमूद केले.