नागपूर : माणसांना होणारे कॅन्सर, हार्ट अटॅक, किडनीचे आजार, मधुमेह, थॉयराईड हे गेल्या काही वर्षांत पाळीव प्राणी कुत्रा आणि मांजरीमध्येही मोठ्या प्रमाणात आढळत आहे. या आजारांनी बाधित होणारे श्वान व मांजरी ह्या सर्वाधिक विदेशी प्रजातीच्या आहेत. या आजारांवर वेळीच उपचार न झाल्याने जनावरांचा मृत्यूची संख्या वाढली आहे.
पशुचिकित्सक डॉ. हेमंत जैन हे अनेक वर्षांपासून पशूंवर चिकित्सा करतात. त्यांच्यामते कुत्रे व मांजरांना माणसाप्रमाणे किडनी, हार्ट, लिव्हर, मधुमेह, थॉयराईड आदी आजार होतात. कुत्रे व मांजरांना वाढत्या वयानुसार किडनीचे आजार होता. किडनीचे आजाराचे प्रमाण कुत्रे व मांजरीमध्ये १० ते २० टक्के आहे. कॅन्सरचे प्रमाणही मांजर व कुत्र्यांमध्ये जास्त आहे. रॉटव्हीलर, बॉक्सर, जर्मन शेफर्ड, गोल्डन रेट्रीव्हर या कुत्र्यांमध्ये कॅन्सरचे प्रमाण जास्त आढळते. गोल्डर रेट्रीव्हर, पामेलियन, कॉकर या कुत्र्यांमध्ये मधुमेह आढळून येतो. हृदयाशी संबंधित आजार ३ टक्के कुत्र्यांमध्ये व २ टक्के मांजरी दिसून आले आहे.
ही आहेत कारणे
देशी कुत्र्यांच्या तुलनेत विदेशी कुत्र्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांच्या जीनमध्ये डिफेक्ट असतो. आनुवांशिकतेतून आजार वाढतात. वातावरणाचा परिणाम जाणवतो. विशेष म्हणजे हे पाळीव प्राणी कमर्शिअल फुड खातात, त्यातून हे आजार वाढतात.
- किडनी, हार्ट, लिव्हर, मधुमेह, थॉयराईट हे रोग झाल्यास कोणते खाद्य व औषध द्यावे हे तज्ज्ञ पशुचिकित्सकांकडून समजून घ्यावे. रक्त तपासणी, लघवी तपासणी, एक्सरे, सोनोग्राफी आदींद्वारे रोगाचे निदान करता येते. पाळीव प्राण्यांना सर्व प्रकारच्या लसी द्याव्या.
-डॉ. हेमंत जैन, पशुचिकित्सक