लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘अस्थमा’ किंवा ’दमा’ हे शब्दच घाबरविणारे आहेत. या आजाराच्या नावापासूनच गैरसमजुतींना सुरुवात होते. दम्याविषयीची सर्वात अडचणीची ठरणारी बाब म्हणजे अर्धवट उपचार. जरा बरे वाटायला लागले की औषधे घेणे थांबविले जाते. अनेक वेळा औषधोपचारांचा खर्च कमी करण्यासाठी रुग्ण असे करतात. दुर्दैवाने अशा अर्धवट उपचारामुळे दम्याचे नियंत्रण करताना एक मोठे आव्हान उभे राहते. आजार बळावतो. तो धोकादायकही ठरू शकतो. यामुळे अशी पावले उचलण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.जगात मे महिन्याचा पहिला मंगळवार हा अस्थमा दिवस म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर पल्मोनोलॉजिस्ट डॉ. राजेश स्वर्णकार व बालरोग तज्ज्ञ डॉ. बलवंत खोब्रागडे यांनी या आजारावर प्रकाश टाकत भारतात अस्थमाचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.दम्यावर ‘इन्हेलर थेरपी’ लाभदायकडॉ. स्वर्णकार म्हणाले, वस्तुस्थिती ‘दमा’ संसर्गजन्य नाही. दमा हा अनुवांशिक आजार आहे. दम्याची कारणे व झटके वेगवेगळ्या व्यक्तीनुसार बदलतात व त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने दम्याच्या उपचारांचे नियोजन करणे आवश्यक असते. दमा हा दीर्घकाळ चालणारा आजार असून, त्याला योग्य व नियमित देखभालीची गरज आहे. ‘इन्हेलर थेरपी’मुळे दमेकरी रुग्णांचे जीवन खरोखरच बदलून टाकले आहे. इन्हेलर म्हणजे तोंडावाटे औषध ओढण्याचे उपकरण. इन्हेलेरच्या माध्यमातून औषधे घेतल्यामुळे ते थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. अधिक सुरक्षित आहे. परंतु असे असतानाही ‘इन्हेलर’विषयी अनेक गैरसमज आहेत. यामुळेच पुढे अनेक रुग्ण बरे वाटू लागल्यास ‘इन्हेलर’ बंद करतात. मध्येच असे उपचार थांबविणे हे खूपच धोकादायक ठरते. सध्या अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याची चिंताही डॉ. स्वर्णकार यांनी व्यक्त केली.सहापैकी एका बालकाला अस्थमाडॉ. खोब्रागडे म्हणाले, शहरात मेट्रो व सिमेंट रस्त्यांच्या कामांसह इतरही बांधकामामुळे सतत उडणारी धूळ, जळणारा कचरा व खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे अस्थमा (दमा) रुग्णांची संख्या वाढत आहे. जगात सुमारे १५० दशलक्ष लोक दम्याच्या आजाराने पीडित आहेत. तर भारतात १५ ते २० दशलक्ष लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. ५ ते ११ वयोगटातील बालकांमध्येही अस्थमा वाढत आहे. भारतात सहापैकी एका बालकाला अस्थमा असल्याचे समोर आले आहे. श्वसनमार्गात अडथळे आल्याने किंवा तो बंद झाल्याने निर्माण होणारी अस्वस्थता म्हणजे दमा. अनेक पालकांना वाटते की, दमा हा सर्दी-खोकल्यासारखा कधी तरी येणारा आजार आहे आणि केमिस्टकडून साधी औषधे, सिरप घेतात. व्हेपोरब लावले जातात. मात्र या गैरसमजामुळे दम्याचा आजार बळावण्याची शक्यता वाढते. कधी कधी त्यातून तीव्र स्वरूपाचा झटका येऊ शकतो. मुळात दम्यावर नियमित उपचार करण्यासाठी इन्हेलरच उपयुक्त ठरते.