नागपूर : पर्यावरणपूरक, आरोग्यवर्धक, इंधनबचत करणारा पर्याय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सायकलींना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. उपराजधानी नागपुरातही तरुणाईपासून ते आबालवृद्धांपर्यंत सायकलची क्रेझ वाढली आहे. मधली काही वर्षं तरुणाईच्या आयुष्यातून सायकल हद्दपार झाली होती. पण, आता अचानक जबरदस्त वेगानं सायकल अनेकांच्या आयुष्यात परत आली आहे नव्हे ‘रायडिंग’चं याडच सर्वांना लागलंय. नागपुरात तर सनदी अधिकाऱ्यांपासून डॉक्टर्स, वकील, व्यावसायिक व सर्वच क्षेत्रांतील लाेक ‘रायडर्स’ बनले आहेत.
पॅरिसच्या धर्तीवर तयार झालेला ‘नागपूर रॅन्डोनियर’ या ग्रुपची सदस्यसंख्या गेल्या काही वर्षातच २० वरून १५०० वर पाेहोचली आहे. शहरात यासारखे आणखी बरेच ग्रुप असून, लाेकांचा कल पाहता सायकल रायडिंगची क्रेझ लक्षात येऊ शकते.
फिटनेसचा उत्तम पर्याय : आयुक्त राधाकृष्णन बी.
महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांची सायकल रायडिंगची आवड सर्वश्रुत आहे. व्यस्त कामातून वेळ काढून आठवड्यात १००-१५० किमीचा प्रवास ते सायकलने करतात. त्यांच्या मते वेगवान जगात आपल्या आराेग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी काेणताही व्यायाम प्रकार करणे गरजेचे आहे. यातही सायकलिंग हा सर्वाेत्तम पर्याय आहे. रायडिंग साेपी आहे आणि काेणत्याही वयाेगटाची व शरीरयष्टीची व्यक्ती रायडिंग करू शकते. हृदयाची समस्या दूर करण्यासाठी हा महत्त्वाचा उपाय आहे. शिवाय आत्मविश्वास व उत्साह वाढविण्यासाठीही सायकलिंग उत्तम आहे.
सायकलने बरा केला पायाचा आजार : विकास पात्रा
सायकलने एका वर्षात २००, ३००, ४०० व ६०० किमीचा प्रवास प्रत्येकी पाचदा करणारे भारतातील एकमेव व्यक्ती असलेले विकास पात्रा यांच्यासाठी सायकल एक पॅशन आहे. २०१५ साली पायाच्या दुर्धर आजाराने पीडित असलेल्या विकास यांना थाेडे दूर चालणेही कठीण झाले हाेते. सायकलिंग सुरू केल्यानंतर अगदी काही महिन्यातच त्यांचे दुखणे गायब झाले. त्यानंतर सायकल त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग झाला. सायकलने १२०० किमीचा ब्रेव्हे चॅलेंज पूर्ण करणारे ते देशातील पहिले व्यक्ती ठरले. त्यांनी नागपूर रॅन्डाेनियर ग्रुपच्या माध्यमातून शेकडाे लाेकांना सायकलशी जाेडले. नवीन आनंद, उत्साह व आत्मविश्वास वाढविण्यासाठी सायकल रायडिंग हा सर्वाेत्तम पर्याय असल्याचे ते सांगतात.
८० वर्षांचे तरुण रायडर भूपेंद्र आर्य
वयाची ऐंशी गाठलेल्या भूपेंद्र आर्य यांचा फिटनेस बघून भल्याभल्यांना आश्चर्य वाटते. मात्र डाेंगरावर सायकल दामटताना त्यांची गती चमत्कारिक असते. ते तरुणांनाही आव्हान देण्याच्या मुद्रेत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून सायकलिंग करणाऱ्या आर्य यांची भारतातील सर्वात वयाेवृद्ध सायकल रायडर म्हणून गणना हाेते. त्यांनी १२ वेळा २०० किमीचे आणि पाचदा ३०० किमीचे आव्हान पूर्ण केले आहे. सायकलिंगमुळेच आपण जिवंत असल्याचे ते सांगतात.
सायकलिंगने आराेग्य सांभाळणारे डाॅक्टर दाम्पत्य
डाॅ. स्वाती आणि अजय कुळकर्णी यांच्यासाठी सायकलिंग आता सवयीचा भाग झाली. २०१४ पासून हे दांपत्य फिटनेसच्या विचाराने सायकलिंगकडे वळणे. पुढे राेजच्या सवयीत रायडिंगचे अंतर वाढत गेले आणि चॅलेंज स्वीकारण्याची तयारी सुरू झाली. पहिल्यांदा काेकण ते गाेवा हे ३०० किमीचे चॅलेंज त्यांनी पूर्ण केले. पुढे नागपुरात वर्षभरात हाेणाऱ्या प्रत्येक इव्हेंटमध्ये त्यांचा सहभाग पक्का झाला. डाॅ. स्वाती यांच्या मते चार भिंतीआडच्या व्यायामापेक्षा आउटडाेअर सायकलिंग उत्तम आहे. सायकलिंग एक ॲडव्हेंचर आहे आणि आराेग्यासाठीही तर सर्वाेत्तम आहे.
शारीरिक व मानसिक ताण झटक्यात दूर
इंटेरियर डिझाइनर अंकिता पुसदकर यांनी हाैस म्हणून सुरू केलेली सायकल रायडिंग आता त्यांची पॅशन झाली आहे. वर्षभरात १०००० किमीचा टप्पा गाठण्याचे चॅलेंज पूर्ण करणाऱ्या त्या नागपुरातून एकमेव महिला हाेत्या. आता तर त्या सायकल रायडिंगच्या प्रचारकही आहेत. सायकलिंगचे २५च्या जवळपास इव्हेंट रॅन्डाेनियरच्या माध्यमातून आयाेजित केले जातात. सायकलिंग मानसिक थकवा दूर ठेवण्याचे साधन आहे. हृदयाच्या समस्या, काेलेस्टेराॅल असे आजार दूर ठेवण्यासाठी सायकलिंग उत्तम पर्याय आहे. सायकलिंगमुळे बीपी, शुगर व इतर आजाराने पीडित असलेल्यांचे आयुष्य बदलल्याची अनेक उदाहरणे ग्रुपमध्ये असल्याचे त्या सांगतात. दरवर्षी सायकल रायडिंगकडे वळणाऱ्यांचे प्रमाण चार-पाच पटीने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.