निशांत वानखेडे
नागपूर : बौद्धिक क्षमतेने हुशार असलेल्या मानवी प्रजातीला महत्त्व देताना आपल्या आसपास अधिवास करीत असलेल्या घटकांबद्दल किमान जाणीव असणे आज काळाची गरज आहे. गाय, म्हैस, श्वानांसारख्या पाळीव प्राण्यांसह जंगलातील वन्यजीव आणि कुंडीतील फुलझाड व आडदांड वाढणाऱ्या वडापासून ते जमिनीला भिडणाऱ्या गवताचेही पर्यावरणाच्या दृष्टिने तेवढेच महत्त्व आहे. तुम्हाला माहीत आहे का, या पृथ्वीवर म्हणजे जगात २ लक्ष ४१ हजार ६४६ प्रकारच्या प्राण्यांच्या तर ४ लक्ष ६५० वनस्पतींच्या प्रजाती आहेत. त्यातले २३९३० प्राणी आणि ४५१३५ प्रजातीच्या वनस्पती भारतात आहेत. आपला महाराष्ट्रही या सजीव जैवविविधतेच्या दृष्टीने श्रीमंत आहे. ४१५५ प्रजातीच्या वनस्पती आणि ६९५४ प्रजातीच्या प्राण्यांचा महाराष्ट्रात अधिवास आहे.
विदर्भालाही सुंदर अशी जैवविविधता लाभली आहे. वनस्पती तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार विदर्भात १३०० च्या जवळपास वनस्पतींच्या प्रजाती आहेत. यात फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पतींचा समावेश आहे. १५०० च्यावर प्राण्यांच्या प्रजातींचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदविले आहे. उल्लेखनीय म्हणजे भारतातील १३०० पक्ष्यांच्या प्रजातींपैकी ५७७ महाराष्ट्रात व ४३५ प्रजाती विदर्भात आढळतात. १८७ प्रजातीच्या फुलपाखरांची नोंद विदर्भात करण्यात आली आहे. प्राण्यांमध्ये मासे, जमिनीवर व पाण्यात राहणारे उभयचर, सरपटणारे प्राणी, हवेत उडणारे पक्षी व सस्तन प्राणी अशा पाच प्रकारात विभागणी होते. पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय ही एक विभागणी होते. वनस्पतींचेही ७ प्रकार नोंदविले जातात. या सर्वांचा अभ्यास हेही एक मजेशीर शास्त्र आहे. जागतिक जैवविविधता दिनानिमित्त या घटकांचा विचार व्हावा म्हणून हा प्रयत्न होय.
वनस्पतींच्या प्रजाती
प्रकार जगात भारतात महाराष्ट्रात
अल्गी ४०००० ७११५ ३४२
बुरशी किंवा फंगी ७२००० १४५०० १८४
दगडफुल १३५०० २२२३ ०
शेवाळ १४५०० २५०० ५५
बीज नसलेले १०००० १२०० ७३
अनावृत्त/खुले बीज ६५० ६७ ०१
पुष्प वनस्पती २५०००० १७५२७ ३५००
एकूण ४००६५० ४५१३२ ४१५५
प्राण्यांच्या प्रजाती
प्रकार जगात भारतात महाराष्ट्रात
मत्स २१७२३ २५४६ ६५३
उभयचर ५१५० २०४ ५३
सरपटणारे ५८१७ ४४६ ११७
हवेत उडणारे ९०२६ १२२८ ५७७
सस्तन ४६२९ ३७२ १२९
पृष्ठवंशीय ४६३४५ ४७९६ १५०८
अपृष्ठवंशीय १,९५,३०१ १९१३४ ३९१७
एकूण २,४१,६४६ २३९३० ६९५४
विदर्भात १३०० वनस्पती, १५०० च्यावर प्राणी, ४३५ पक्षी प्रजाती व १८७ फुलपाखरे. ३५ च्यावर पिकांचे प्रकार.