सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २५ लाख लोकसंख्या असलेल्या नागपुरात अर्धा टक्काही नागरिक रक्तदान करीत नाहीत. शहरात दिवसाकाठी साधारण हजार रक्त पिशव्यांची गरज भासत असताना सध्याच्या स्थितीत ३५० ते ४०० रक्त पिशव्या मिळतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) एक टक्का नागरिकांनी रक्तदान केले तरी सर्व रु ग्णांची गरज भागू शकते. मात्र, हे समीकरण नागपूरला लागू होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त मिळविण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागत असून रक्ताअभावी शस्त्रक्रिया, अपघात व आजारपणातील रुग्णांचा जीव टांगणीला लागत आहे.उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यासह रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी ३००वर खासगी रूग्णालये आहेत. यामुळे विदर्भच नाहीतर छत्तीसगड, मध्यप्रदेशातून रूग्णांचा ओढा नागपूरकडे वाढला आहे. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळांतपणाच्या रूग्णांची संख्या अधिक असते. उन्हाळ्याच्या दिवसात महाविद्यालये बंद राहत असल्याने रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्याने दरवर्षी रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. सध्याच्या स्थितीत ‘निगेटीव्ह’ ग्रुपचे रक्ताची चणचण असून काही रक्तपेढ्या ‘निगेटीव्ह’ ग्रुपचा रक्तदाता उपलब्ध करून देण्याच्या अटीवरच या ग्रुपचे रक्त देत आहेत. ‘ओ’ व ‘बी’ पॉझिटीव्ह रक्ताचा साठाही जेमतेम असल्याची रक्तपेढ्यांचे म्हणणे आहे.
महिन्याची गरज २५ हजार रक्त पिशव्यांचीशहरात चार शासकीय रक्तपेढीसह पाच खासगी रक्तपेढ्या आहेत. येथे दररोज जवळपास हजारहून अधिक रक्त पिशव्यांची मागणी होते. रक्त दिलेल्या सर्वच रूग्ण ‘रिप्लेसमेंट’ रक्त देतील असे नाही. आजघडीला अपघात, बाळंतपण, डायलिसिसचे रूग्ण, एचआयव्हीबाधित, टी. बी., कर्करोग, सिकलसेल व थॅलेसेमिया आजारांच्या रूग्णांसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची भरज पडते. मात्र, नागपुरात केवळ महिन्याकाठी १२ हजार रक्तदाते स्वेच्छेने रक्तदान करतात. लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ०.४८ टक्के आहे. रक्ताची गरज भासविण्यासाठी किमान महिन्याकाठी २५ हजार रक्तदात्याची आवश्यकता आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये स्वेच्छा रक्तदान करण्याचे प्रमाण वाढले असलेतरी पुणे-मुंबईच्या तुलनेत शहरात स्वेच्छा रक्तदान करण्याचे प्रमाण कमी आहे. वाढदिवसाला स्वत:हून रक्तदान करणाऱ्यांची संख्या तुरळक आहे. तसेच विविध सामाजिक संस्था-संघटनांचे स्वत:हून शिबिरे आयोजित करण्याचे प्रमणाही कमी आहे. हे वाढविण्यासाठी रक्तपेढी प्रमुखापासून ते स्वेच्छा रक्तदान करणाऱ्यांनी कसोशीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. हा फरक जेव्हा संपेल तेव्हा शहरात रक्ताची टंचाई जाणवणार नाही.-डॉ. संजय परातेविभाग प्रमुख, आदर्श रक्तपेढी, मेडिकल