सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या रुग्णाचे प्राण रक्ताविना तडफडत असतात, त्यावेळी स्वेच्छेने पुढे येऊन रक्तदान करणारा रक्तदाता हा देवदूत नसतो तर प्रत्यक्ष देवच असतो. रक्तसंक्रमणाच्या, रक्तघटक वेगळे करण्याच्या अत्यंत आधुनिक पद्धती विकसित झाल्या, परंतु विज्ञानाला मानवी रक्ताचा पर्याय शोधता आला नाही. म्हणून आजही रक्तदानाला पर्याय नाही. या दानामुळे माणसाचे जीव वाचतात. रक्तदान करणारी मंडळी माणुसकीच्या भूमिकेतून खूप मोठे कर्तव्य पार पाडतात. कोरोनाच्या काळात रक्त व प्लाझ्माचा तुटवडा पडला असताना अनेक रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान व प्लाझ्मा दान केला आहे. माणुसकीच्या भूमिकेतून खूप मोठे कर्तव्य पार पार पाडले आहे, आणि पुढेही हे कर्तव्य बजावत राहणार आहे.
मेडिकलचा रक्तपेढीचा असाही ‘आदर्श’
आदर्श रक्तपेढीचा पुरस्कार प्राप्त असलेल्या मेडिकलने कोरोना काळात ११७ रक्तदान शिबिर घेऊन गोरगरीब रुग्णांना १०,००० हजार रक्त पिशव्यांचे संकलन करीत आदर्श निर्माण केला आहे. रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते यांच्या या प्रयत्नामुळे रक्तपेढीत फारसा तुटवडा जाणवला नाही. विशेष म्हणजे, त्यांनी कोरोनातून बरे झालेल्या १०० हून अधिक लोकांना प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रवृत्तही केले. या सेवेत रक्तपेढीचे समाजसेवा अधीक्षक किशोर धर्माळे यांची मोठी मदत मिळाली.
सेवा फाऊंडेशनने जमा केल्या ११०० रक्त पिशव्या
रक्ताची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत असल्याचे लक्षात आल्यावर डिफेन्स वाडी येथील रहिवासी राज खंडारे सेवा फाऊंडेशन नावाची संस्था उभी केली. यात शेकडो तरुण-तरुणींना सहभागी करून घेतले. खंडारे या संस्थेच्या मदतीने दरवर्षी १००० ते १५०० युनिट रक्तसंकलन करतात. कोरोना महामारीतही सेवा फाऊंडेशनच्या सदस्यांचे कार्य अविरत सुरू होते. या काळात तब्बल ११०० रक्त पिशव्यांची मदत शासकीय रुग्णालयांना करून आपले कर्तव्य बजावले.
रक्तासाठी रात्री-बेरात्री धावून जाणारे भोसले
५५ वर्षांचे पुरुषोत्तम भोसले यांनी वयाच्या १८ व्या वर्षांपासून रक्तदानाला सुरुवात केली. नुकतेच त्यांनी रक्तदानाची शंभरी गाठली. मेडिकलमधील रुग्णांच्या अडीअडचणी सोडविण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन त्यांनी स्वत: रक्तदान केलेच, पण आपली मित्र मंडळी, नातेवाईकांकडूनही रक्तदान करवून घेतले. रक्तासाठी रात्री-बेरात्री धावून जाणारे ‘भोसले’ अशी त्यांची ओळख झाली आहे.
कोरोन काळात पाच वेळा प्लाझ्मा दान करणारा उदय
बाबांच्या ऑपरेशनच्या वेळी रक्ताच्या भासलेल्या चणचणीतून उदय तिमांडे याला रक्तदान चळवळउभी करण्यासाठी प्रेरित केले. त्याने ‘हेल्प फॉर ब्लड डॉट कॉम’ नावाची वेबसाईटही सुरू केली होती. मागील १० वर्षांपासून दर तीन महिन्याने उदय न चुकता रक्तदान करतो. कोरोना काळात त्याने पाच वेळा प्लाझ्माही दान करून कोरोनाबाधिताला मदतीचा हातही दिला.
३४८ रक्त पिशव्यांचे संकलन करण्याचा संकल्प
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४८व्या राज्यभिषेक दिनाच्या निमित्ताने त्यांना अनोखी आदरांजली वाहण्यासाठी दत्ता शिर्के यांनी युवा चेतना मंचच्या माध्यमातून ३४८ रक्त पिशव्यांचे संकलन करण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत त्यांनी २२० रक्त पिशव्यांची मदत मेडिकलला केली आहे. मंचच्या माध्यमातून अनेक गोरगरीब रुग्णांना त्यांनी मदतही केली आहे.
शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी रक्तदानासाठी पुढाकार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सामाजिक अधीक्षक या पदावर काम करीत असताना श्याम पांजला नेहमीच रुग्णांना येणाऱ्या अडचणी सोडवित असतात. कोरोना काळात विशेषत: शासकीय रुग्णालयात स्वेच्छा रक्तदात्यांची संख्या कमी झाली असताना त्यांनी रक्तदान करून आपल्या स्वत:पासून सुरुवात केली, आणि इतरांनाही प्रेरणा दिली. श्याम मागील सात वर्षांपासून दर तीन महिन्यानी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावत आहे.