किशोर बागडेगुवाहाटीमनात आणल्यास कोणतीही गोष्ट अडथळा ठरू शकत नाही, हेच दाखवून देण्याचा प्रयत्न विश्व स्पर्धेच्या आयोजनाद्वारे होणार आहे. यातून भारताला माझ्यासारख्या आणखी युवा मेरी कोम गवसतील, असा विश्वास विश्व आणि आशियाई चॅम्पियन एम. सी. मेरी कोम हिने व्यक्त केला आहे. एआयबीएने भारताला पहिल्यांदा विश्व युवा महिला बॉक्सिंग आयोजनाचा मान दिला. स्पर्धेचे आयोजनदेखील ईशान्येकडील आसामच्या राजधानीत होत आहे. या रांगड्या खेळात पुरुषी वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या भारतीय महिलांनी स्वत:ची ओळख निर्माण केली.मेरी कोम, निकोला अॅडम्स, कॅटी टेलर आणि क्लॅरिसा शिल्ड्स यांनी बॉक्सिंगच्या इतिहासात नावलौकिक मिळविला आहे. गुवाहाटीत दाखल झालेली युवा नारी शक्ती या चौघींना आपला आदर्श मानते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचे यापैकी प्रत्येकीचे स्वप्न आहे. आयोजनातून भारतालासुद्धा महिला बॉक्सिंगमध्ये नवी पिढी घडविणे शक्य होईल. खेळाडूंना त्यांचा सन्मान मिळेल असा आशावाद मेरी कोमला आहे. या पार्श्वभूमीवर मेरीसोबत साधलेला संवाद...
प्रश्न: विश्व चॅम्पियन ते आॅलिम्पिक कांस्य आणि आता आशियाई सुवर्ण हा प्रवास कसा झाला....मेरी कोम : माझा जन्मच संघर्षासाठी झाला आहे. लहानपणी हालअपेष्टा सहन करीत अॅथ्लेटिक्सकडे वळायचे होते. पण मणिपूरमध्ये डिंकोसिंग या बॉक्सरने मला प्रेरणा दिली. मात्र बॉक्सिंगमध्ये स्त्रियांनी भाग घेतला तर ठोशांमुळे चेहरा विद्रपू होईल व लग्नात अडचणी निर्माण होतील, या समजापोटी घरातून भरपूर विरोध झाला. या विरोधास न जुमानता १९९९ मध्ये स्पर्धात्मक मुष्टियुद्धाचा सराव सुरू केला. लढतींची छायाचित्रे प्रसिद्ध होताच वडिलांनी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. पुढे २००२ ते २०१० या कालावधीत पाच वेळा विश्वविजेतेपद पटकाविले. माझ्या प्रत्येक पदकामागे एक वेगळी कथा आहे.
प्रश्न: पुढील लक्ष्य काय....मेरी कोम : मला टोकियोत २०२० चे सुवर्ण जिंकायचे आहे. ३६ वर्षांची असूनही कष्ट सहन करून लढण्याची जिद्द कायम आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक होते; मात्र संघटनात्मक मतभेदांमुळे पात्रता फेरीत अपेक्षेइतके यश मिळविता आले नाही. ती संधी हुकली. त्यानंतरही करिअर सुरू ठेवले. यंदा आशियाई स्पर्धेआधी दोन-तीन स्पर्धामध्ये अपेक्षेइतके यश मिळाले नव्हत. निवृत्त होऊन संसारावर लक्ष केंद्रित करावे, अशी टीकाही सहन करावी लागली. मात्र पराभवामुळे निराश न होता कमालीची जिद्द दाखवीत आणखी कठोर मेहनत केली. आपण अद्यापही सोनेरी कामगिरी करू शकतो हे दाखवून द्यायचे आहे.
प्रश्न : राज्यसभेवर झालेली नियुक्ती खेळाडूंच्या समस्यांना व्यासपीठ मिळवून देईल, अशी आशा बाळगायची काय?मेरी कोम : मी केवळ शोभेची खासदार नाही. लोकांच्या, विशेषत: खेळाडूंच्या समस्यांना वाचा फोडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, हे ओळखूनच मिळेल तेव्हा कर्तव्ये पार पाडत असते. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या उपसमितीवर काम करते. अनेक बिगरशासकीय सामाजिक संस्थांवर कार्यरत आहे.मणिपूरमध्ये बॉक्सिंग अकादमी उघडली आहे.अधिकाराची पदे ही सेवेची संधी आहे, हे डोक्यात ठेवून काम केल्यास समाजाचे हित साधले जाते.
प्रश्न: तीन मुलांची आई, खासदार, खेळाडू, सेलेब्रिटी, प्रशिक्षक, संघटक इतकी सर्व जबाबदारी कशी पार पाडतेस?...मेरी कोम : चूल आणि मूल ही कल्पना मला कधीही मान्य नाही. तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर मी व्हिएतनाममध्ये आशियाई पदक जिंकले. जुळ्या मुलांपासून दूर राहून सराव केला तरच सरावात कोणताही व्यत्यय येणार नाही, याची खात्री असल्यामुळेच मनाने कणखर बनत हजारो मैल दूर सराव करण्याचा निर्णय घेतला. पती ओनखोलर व कुटुंबीय मुलांना सांभाळत होते. आता अकादमीची प्रशिक्षक आणि राज्यसभेची खासदार बनले आहे. पण सरावात कुठलाही अडथळा येत नाही. दिवसातील २४ तासही आपल्याला कमी पडतात. सर्वच भूमिका पार पाडताना तारेवरची कसरत होतेच, तथापि त्याबाबत कोणतीही तक्रार नाही. सर्व भूमिकांना योग्य न्याय देते. म्हणूनच तर मला लोक मुलखावेगळी सुपरमॉम संबोधतात.