नागपूर : तिरंदाजी विश्वचषकात भारताला पहिले सुवर्ण जिंकून देणाऱ्या नागपूरच्या ओजस देवतळेला आता ऑलिम्पिक पदकाची आस लागली आहे. नुकत्याच जर्मनीच्या बर्लिन शहरात झालेल्या तिरंदाजी विश्वचषकात ओजसने वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटकावत भारतासाठी इतिहास रचला होता. ९२ वर्षांच्या कालखंडात अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला. याव्यतिरिक्त ओजसने विविध गटांत सुवर्ण कामगिरी करत तिरंदाजी विश्वचषकात आपले नाणे खणखणीत वाजवले.
तुर्की आणि शांघाय येथे झालेल्या विश्व चॅम्पियनशिपमध्येही ओजस देवतळेने ज्योती सुरेखा वेनमच्या साथीने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. तसेच, कोलंबिया येथे झालेल्या चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या टप्प्यात प्रथमेश जावकर, अभिषेक वर्मा आणि ओजस देवतळे या भारतीय संघाने पुरुषांच्या गटात विजेतेपद पटकावले होते. सांघित प्रकारात चमकदार कामगिरी करणाऱ्या ओजसने बर्लिनला वैयक्तिक प्रकारातही सुवर्णपदकाचा सिलसिला कायम ठेवला.
‘लोकमत’सोबत बोलताना ओजसने आपल्या दैदीप्यमान यशाबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, 'अथक परिश्रमाचे खऱ्या अर्थाने चीज झाले. या यशामुळे भविष्यातील खडतर आव्हानांना तोंड देण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. तिरंदाजी विश्वचषकातील प्रत्येक खेळाडू मातब्बर होता. त्यामुळे वाट सोपी नसेल याची मला कल्पना आली होती. पण उपांत्यपूर्व फेरीत पोलंडच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध १५० पैकी १४९ गुण घेत विजय मिळाल्याने माझा उत्साह द्विगुणीत झाला. त्यामुळेच उपांत्य फेरीत नेदरलंड्सच्या स्लॉकरविरुद्ध मी याच कामगिरीची पुनरावृत्ती करू शकलो. मात्र, अंतिम सामन्यात पोलंडच्या दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध १५० पैकी १५० गुण ही मी केलेली कामगिरी माझ्यासाठी स्वप्नवत होती.'
एशियाड आणि ऑलिम्पिकवर नजर
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ओजसने सरावाला सुरुवात केली आहे. या स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकण्याच्या तो प्रयत्नात आहे. याव्यतिरिक्त २०२८ ला होणारे लॉस एंजलिस ऑलिम्पिक हे ओजसचे प्रमुख लक्ष्य आहे. तो म्हणतो, 'ऑलिम्पिकच्या तयारीसाठी माझ्याकडे भरपूर अवधी आहे. सरावात सातत्य ठेवून मला २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्ण कामगिरी करायची आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकावणे हे माझे स्वप्न आहे.'
स्केटिंगकडून तिरंदाजीकडे
ओजसचा इथवरचा प्रवास खूप रंजक ठरलेला आहे. लहानपणी स्केटिंगमध्ये नशीब आजमावल्यानंतर ओजस तिरंदाजीकडे वळला. याबाबत त्याने सांगितले की, 'वडील एनसीसीत स्नॅप शूटर असल्याने शूटिंगविषयी घरात सकारात्मक वातावरण होते. मला सुद्धा नेम धरून लक्ष्य भेदण्यात मजा वाटायची. यातूनच पुढे झिशान सरांच्या मार्गदर्शनात मी तिरंदाजीचे धडे गिरवायला सुरुवात केली. परिणाम असा झाला की २०१९ च्या शालेय राष्ट्रीय खेळांमध्ये मी कांस्यपदक पटकावले. त्यानंतर पदकांचा प्रवास कधी थांबला नाही.' आई-वडील, झिशान सर आणि साताऱ्याचे प्रवीण सावंत सर हे आतापर्यंत मिळवलेल्या ऐतिहासिक यशाचे खरे वाटेकरी असल्याचे ओजस प्रकर्षाने नमूद करतो.