नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा आणि तशाच प्रकारची आकर्षक वास्तू डिझाइन झालेले अजनी रेल्वे स्थानकाचे काम प्रगतिपथावर आहे. २९७ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद असलेल्या या प्रकल्पाला नियोजित मुदतीपेक्षा चार महिने अगोदरच पूर्ण करण्याची तयारी रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने (आरएलडीए) चालविली आहे.
मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येणारे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक म्हणून अजनी स्थानकाचे नाव असून, येथून देशाच्या विविध भागांत रेल्वेगाड्यांचे आवागमन होते. देशातील विविध रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेअंतर्गत अजनी स्थानकाला सॅटेलाइट स्टेशनच्या रूपात विकसित केले जात आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर दररोज ४५ हजार प्रवासी अजनी स्थानकावरून आवागमन करू शकतील. येथे प्रवाशांना उच्च दर्जाच्या सोयीसुविधा देण्याचे नियोजन असून वृद्ध, दिव्यांग प्रवाशांना अनुकूल अशा सुविधा मिळणार आहेत. त्यासंबंधाने स्थानकांच्या पुनर्विकासाशी संबंधित कामे केली जात आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसाठी तब्बल १० मीटर रुंदीचे दोन एफबीओ बांधले जाणार आहेत. त्याला ट्रॅव्हलेटर्स संलग्न राहणार आहेत. प्रत्येक प्लॅटफॉर्मला एस्केलेटर, लिफ्ट आणि जिना असेल. ऑटो, कार, टॅक्सीसाठी ३६७९ चाैरस मीटरची प्रशस्त पार्किंग राहणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी ड्रॉप आणि पिकअप झोन वेगळे राहणार आहे.
येथे पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही दिशांना स्थानकाची प्रशस्त इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. फलाटाच्या बांधकामाचीही तयारी सुरू असून, प्रवाशांना अडचणीचे होऊ नये म्हणून सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्याचा नियोजित अवधी जानेवारी २०२६ चा आहे. मात्र, आम्ही हे काम चार महिने आधीच अर्थात सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करू, असा विश्वास आरएलडीएने व्यक्त केला आहे.