लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचा उन्हाळा तसा प्रसिद्धच आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून उन्हाळा जाणवू लागला आहे. तापमान पूर्वीही ४५, ४८ पर्यत जायचे. पण त्याची झळ बसत नव्हती. आता तापमान ४० वर गेले की, प्रचंड उकाडा जाणवतो. अंग भाजणाऱ्या उन्हामुळे सकाळी ९ वाजतापासून बाहेर पडणे कठीण झाले आहे. कूलर, एसीशिवाय घरात राहणे शक्य नाही. उन्हाळ्यात नागपूर पेटून राहिले की काय, असा भास होतो. या सर्वांचे कारण म्हणजे विकासाच्या प्रक्रियेत वसुंधरेकडे झालेले दुर्लक्ष आहे. त्याचे परिणाम निव्वळ मानवालाच नाही, तर संपूर्ण इको सिस्टिमला जाणवत आहे.कधीकाळी शहरातील तलाव हे नागपूरचे वैभव होते. पिण्याच्या पाण्याबरोबरच भूगर्भातील पाण्याची पातळी तलावामुळे वाढत होती. तेव्हा विहिरींना २०, २५ फुटांवर पाणी लागायचे. तलावातील जलचर सुरक्षित होते. आता दरवर्षी उन्हाळ्यात तलावातील जलचर मरतात. कारण तलावातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाली आहे. तलावांना गटारलाईन जोडल्या आहे. जलकुंभीमुळे लेंडी तलावाचे अस्तित्व हिरावले आहे. नाईक तलाव धोक्यात आहे. तलावाच्या सभोवताली करण्यात आलेल्या सिमेंटीकरणामुळे दरवर्षी तलाव कोरडे पडत आहे. विसर्जनाचा सोहळा हा तलावांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. तलावांच्या या दुरवस्थेमुळे तलावातील जलचरच नाही तर, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे.शहराचा विकास झपाट्याने होत आहे आणि त्यासाठी या वसुंधरेचे संवर्धन करणारी वृक्ष धडाक्याने कापली जात आहे. प्रत्येक वृक्षाची एक इकोसिस्टम असते. ज्यात अनेक प्रकारच्या जीवजंतूचे अस्तित्व वृक्षामुळे टिकलेले असते. पण शहराच्या विस्तारात, प्रगतीत वृक्षाची छटाई ही वसुंधरेच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारी आहे.वृक्षगणनेतून वास्तव कळेलदर पाच वर्षानी वृक्षगणना केली जाते. पण गेल्या नऊ वर्षांपासून नागपुरात वृक्षगणना झाली नाही. मात्र गेल्या तीन ते चार वर्षात वृक्ष लागवडीचे अनेक अभियान राबविण्यात आले. हे अभियान किती यशस्वी झाले हे वास्तव वृक्षगणनेतून पुढे येईल. आज रस्त्याच्या दुतर्फा असलेली वृक्ष कापली जात आहे आणि डिव्हायडरच्या मध्ये वृक्ष लावली जात आहे. पण हे वृक्ष शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालत आहे. पर्यावरणाला त्याचा कुठलाच फायदा नाही.अर्थ डे नेटवर्क १९७० पासून वसुंधरा दिवस साजरा करते. यावर्षी अर्थ डेची थिम ‘प्रोटेक्ट अवर स्पिसिज’ आहे. पण आज कोरडे पडलेले तलाव, मोबाईल टॉवरचे रेडिएशन, काँक्रिटचे जंगल, सिमेंट रोड, थर्मल पॉवर स्टेशनचे प्रदूषण, त्यामुळे वाढते तापमान यामुळे वसुंधरेतील प्रजातीच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरत आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी सरकारबरोबरच प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडून नष्ट होत असलेल्या प्रजातीचे संरक्षण करणे गरजेचे आहे.सिमेंट रोडमुळे वाढले तापमानउन्हाळा जाणविण्याचे मुख्य कारण सिमेंट रोड ठरत आहे. कारण सिमेंट रोडमुळे शहरात पडणारे पाणी जमिनीत न मुरता, नाल्यांच्या माध्यमातून शहराबाहेर वाहून जात आहे. त्यामुळे शहरातील वस्त्यांमध्ये ग्राऊंड वॉटर लेव्हल कमी झाली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी आग्रह करण्यात येतो. पण शहरात पावसाचे पाणी वाहून जात असेल तर त्यावर विचार करणे गरजेचे आहे.
पक्षी झाले कमीइंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कचे जाळे शहरात इतके प्रचंड वाढले आहे की त्याचा फटका पक्ष्यांना बसतो आहे. शहरातून पक्ष्यांच्या अनेक जाती नामशेष होताना दिसत आहे. मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा मोठा फटका पक्ष्यांना बसतो आहे. सोबतच काँक्रिटच्या जंगलामुळे पक्षी कमी झाले आहे.
ऑक्सिजन हॉटस्पॉट सुरक्षित ठेवण्याची गरजकधीकाळी शहरातील मुख्य रस्त्यावर वृक्षांच्या रांगा असायच्या. आज रस्त्याच्या विस्तारीकरणात मुख्य रस्ते ओसाड पडले आहे. त्यामुळे आज शहरातील महाराजबाग, मेडिकल, सेमिनरी हिल्स, नीरी, मध्यवर्ती कारागृहाचा परिसर हे ऑक्सिजन हॉटस्पॉट ठरत आहे. शहरातील हा ग्रीनबेल्टसुद्धा विकासाच्या प्रक्रियेत नष्ट होत आहे. -
सुरभी जैस्वाल,समन्वयक, अर्थ डे नेटवर्क