लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘अर्थ डे नेटवर्क’ या एनजीओच्यावतीने जगभरात दरवर्षी २२ एप्रिलला जागतिक विश्व पृथ्वी दिवस साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या संक्रमणामुळे हा दिवस डिजिटल पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपुरातसुद्धा महानगरपालिका आणि पर्यावरण संस्था ग्रीन विजिल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल पद्धतीने हा दिवस साजरा केला जाणार आहे.ग्रीन विजिल फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक पृथ्वी दिवस पाळण्याचे यंदाचे हे ५० वे वर्ष आहे. ‘क्लायमेट अॅक्शन’ अशी यंदाच्या वर्षातील मध्यवर्ती संकल्पना आहे. या माध्यमातून वाढत्या प्रदूषणामुळे होणारे जलवायू परिवर्तन थांबविणे, कार्बन उत्सर्जन घटविणे, अन्न वाया घालविण्यापासून थांबविणे, सफाई अभियान आदींवर भर देणे हा या मागील हेतू आहे. या निमित्त यंदा प्रसिद्ध गायकांनी गायलेले ‘धरती मां’ हे गीत हिंदी भाषेसह विविध भाषांमध्ये रिलिज झाले आहे.मध्य भारतासाठी अर्थ डे नेटवर्कच्या समन्वयक म्हणून काम करणाऱ्या नागपुरातील सुरभी जायसवाल म्हणाल्या, अर्थ डे नेटवर्क नागपूर महानगर पालिकेसोबत नागपूर शहरासह लगतच्या परिसरात पर्यावरण संरक्षणासाठी अभियान चालवित आहे. यात पौर्णिमा दिवस अभियान, पर्यावरण पूरक गणेश विसर्जन, स्वच्छ भारत अभियान, जल संरक्षण, कचरा वर्गीकरण आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.
जागतिक पृथ्वी दिन डिजिटल पद्धतीने साजरा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:42 PM