निशांत वानखेडे
नागपूर : संपूर्ण अंतराळात, तारामंडळात पर्यावरण, सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी आहे. सध्यातरी सजीवसृष्टीला अनुकूल असलेला दुसरा ग्रह वैज्ञानिकांना सापडला नाही. त्यामुळे मानवाचे अस्तित्वही पृथ्वीच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. मात्र मानवाने आपल्याच धरणीवरील जल, जंगल, जमिनीचे ज्या पद्धतीने शाेषण चालविले आहे, त्यावरून भविष्यात या ग्रहावर अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे. प्रचंड वाढलेले प्रदूषण, नष्ट हाेत चाललेले वनक्षेत्र, त्यामुळे निर्माण झालेली हवामान बदल व तापमान वाढीची समस्या या पृथ्वीला मंगळ ग्रहासारखे वाळवंट बनविण्याकडे ढकलत आहे. मात्र मानवाने विचार करावा, एकच पृथ्वी आहे आणि तीच जर नष्ट झाली तर जाणार कुठे?
२०५० पर्यंत ५० डिग्रीवर पारा गेला तर काय हाेईल?
विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी यावर्षी उन्हाळ्याच्या झळा साेसल्या आहेत. कधी नव्हे ते यावेळी मुंबई, पुणे, काेकणातील लाेकांना उन्हाचे चटके बसले. एवढेच नाही तर जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील पाच शहरांचा समावेश हाेता. यावरून तापमान वाढीचा अंदाज यायला लागला आहे. वैज्ञानिकांनी आधीच जागतिक तापमान २०५०पर्यंत ३ अंशाने वाढण्याचा इशारा दिला आहे. विदर्भातील परिस्थितीनुसार तापमान ५० अंशावर गेले तर माणसाचे जगणेच कठीण हाेऊन जाईल.
ग्लाेबल वाॅर्मिंगचा धाेका लक्षात घेता जागतिक तापमानवाढ २०५०पर्यंत १.५ अंशावर राेखण्याची शपथ घेण्यात आली हाेती. मात्र, त्यात सर्वच देश अपयशी ठरले आहेत. इंटरनॅशनल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज (आयपीसीसी)ने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार, दीड अंशाची मर्यादा पार केली असून, २०३०पर्यंत तापमान २ अंशाने आणि २०५०पर्यंत ३ अंशापर्यंत वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. याचा अर्थ वेगाने वाढणारे हरित वायूचे प्रदूषण, काेळशावर आधारित ऊर्जा निर्मिती कमी करण्यात आपण अपयशी ठरलाे आहाेत.
विदर्भाचा विचार केल्यास औष्णिक वीज केंद्र ही प्रदूषणवाढीसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरली आहेत. त्यातून उत्सर्जित हाेणारे सल्फर, नायट्राेजन, कार्बन डायऑक्साईड हे वायू पर्यावरणाला सर्वाधिक नुकसान करणारे आहेत. त्यापाठाेपाठ वाहने आणि धुलीकणांचे वाढलेले प्रदूषण धाेक्यात भर घालत आहेत. कार्बन उत्सर्जन ४२५च्या पुढे गेले आहे. नागपुरात एप्रिल महिन्यात १७ दिवस आणि मे महिन्यात तब्बल २१ दिवस प्रदूषित हाेते. या प्रदूषणाचा थेट परिणाम तापमान वाढीवर हाेत आहे.
२००० सालापासून २० वर्षांत विदर्भाचे तापमान ८० टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल यापूर्वीच प्रसिद्ध झाला आहे. केवळ १० वर्षांत तापमानात २ अंशाची वाढ झाली. यावर्षीही गुजरात, राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी मान्सूनी वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे आधीच ४७ अंशापर्यंत गेलेले तापमान २०५०पर्यंत ५० अंशापर्यंत वाढणे निश्चित आहे. असे झाले तर त्याचे दुष्परिणाम भयावह असतील. जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण वाढेल, ज्वलनशील पदार्थांच्या उद्याेगात आगी लागतील, तीव्र तापमानामुळे मृत्यूंचे प्रमाण वाढेल, ढगफुटी, महापुराचे संकट ओढवेल, शेती नष्ट हाेईल, राेगराई वाढेल आणि जनजीवन विस्कळीत हाेऊन अर्थव्यवस्था धाेक्यात येईल, अशी भीती आहे.