सुमेध वाघमारे
नागपूर : ‘हायपरटेन्शन’ म्हणजे उच्चरक्तदाब हा ‘सायलेंट किलर’ आजार आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र हृदयविकाराचा झटका, किडनीचे आजार आणि ‘स्ट्रोक’ येण्याचा धोका असतो. जवळपास २०७ दशलक्ष भारतीय उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. भारतीय प्रौढ लोकसंख्येमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण २९ टक्के आहे. प्रत्येक तिसरा प्रौढ भारतीय उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे. त्यामुळे तुम्हालाही असू शकतो रक्तदाब, तपासणी केली का, असे थेट आवाहन शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांनी केले आहे.
-केवळ एक चतुर्थांश लोकांना उच्च रक्तदाबाची माहिती -डॉ. हरकुट
रक्तदाब म्हणजे शरीरातील धमन्यांच्या भिंतीवर रक्ताने निर्माण केलेला दाब होय. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट यांनी सांगितले की, भारतात प्रौढ लोकसंख्येमध्ये ग्रामीण भागात उच्च रक्तदाबाचे प्रमाण २५ टक्के आहे, तर शहरी भागात हे प्रमाण ३३ टक्के आहे. धक्कादायक म्हणजे, ग्रामीण भागात उच्च रक्तदाब झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. लोकसंख्येपैकी केवळ एक चतुर्थांश लोकांना उच्च रक्तदाबाची माहिती आहे. त्यापैकी २५ टक्केच रुग्ण उच्च रक्तदाबावर उपचार घेत आहेत. एका अंदाजानुसार १०० उच्च रक्तदाब रुग्णांपैकी योग्य औषधोपचाराने फक्त एकाचा रक्तदाब पुरेसा नियंत्रित राहतो. यामुळे उच्च रक्तदाबाबद्दल जागरूकता वाढविण्याची व रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपचार घेण्याची गरज आहे.
-उच्च रक्तदाब असलेल्या २० टक्के रुग्णांना मधुमेह - डॉ. बीडकर
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमेय बीडकर यांनी सांगितले, उच्च रक्तदाब विकाराने ग्रस्त असलेल्या एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांना मधुमेह असतो, तसेच अन्य विकारही ग्रासण्याची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी उच्च रक्तदाबाचे वेळेतच निदान व त्यावर उपचार केले पाहिजेत. उच्च रक्तदाब विकाराने ग्रस्त ३० टक्के रुग्णांना वाढलेल्या ‘बॅड कोलेस्टेरॉल’चा विकार, २५ टक्के रुग्णांना ‘युरिक ॲसिड’ वाढलेले असल्याचा आणि ३५ ते ४० टक्के रुग्णांना लठ्ठपणाचा त्रास असतो. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवला, तर अन्य विकारांपासून दूर राहता येते. रक्तदाब विकार हा जीवनशैलीशी निगडित आहे. त्यामुळे ताणतणावमुक्त व संतुलित जीवनशैली स्वीकारने हा उपचाराचा पहिला टप्पा आहे. आहारातून फॅटयुक्त, तेलयुक्त, फास्ट व जंकफूड, अधिक मीठ असलेले पदार्थ टाळावेत. नियमित व्यायाम करावा. औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल हीच उपचारांची द्विसूत्री आहे.
- ‘ओपीडीत’ येणाऱ्या ५० टक्के रुग्णांना ‘हायपरटेन्शन’- डॉ. देशमुख
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. पी.पी. देशमुख यांनी सांगितले की, विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) येणाऱ्या ३०० रुग्णांमध्ये जवळपास ५० टक्के रुग्णांमध्ये ‘हायपरटेन्शन’ आढळून येते. अयोग्य जीवनशैली, वाढता ताणतणाव, तंबाखू व दारूच्या व्यसनामुळे हा आजार आता ३० वर्षांच्या तरुणांमध्येही दिसून येत आहे. उपचारासाठी येणाऱ्या बहुसंख्य रुग्णांना, त्यांना उच्च रक्तदाब असल्याची माहिती नसते. जेव्हा उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम दिसू लागतात, तेव्हा ते डॉक्टरांकडे येतात. त्यामुळे वयाच्या विसीनंतर वर्षातून किमान एक वेळा आणि पस्तिशीनंतर दोन वेळा रक्तदाब तपासून घेतला पाहिजे.
-तातडीने रक्तदाब कधी मोजावा
* चालल्यावर चक्कर येत असल्यास
* चालल्यावर दम लागत असल्यास
* परिवारात रक्तदाबाचे रुग्ण असल्यास
* ताणतणावयुक्त जीवनशैली असल्यास
* लठ्ठपणा व मधुमेहाचा त्रास असल्यास