नागपूर : शहरात आयोजित ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चे शनिवारी उद्घाटन होत आहे. सुरेश भट सभागृहात सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंपदा व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत, लोकमत एडिटोरियल ग्रुुपचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा, राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल व ऊर्जा तसेच पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत या तीन दिवसीय महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे.यूपीएल समूह आणि बजाज इलेक्ट्रिक लिमिटेड हे या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), सहप्रायोजक मिनीट-मेड यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी नागपुरातयेत आहेत. संत्र्याच्या नारंगी रंगात संपूर्ण शहर रंगले असून या फेस्टिव्हलमध्ये संत्र्याविषयीचे देश-विदेशातील तज्ज्ञ, उत्पादकही सहभागी होणार आहेत.या क्षेत्रात रोजगार आणि पर्यटनाची संधी, संत्र्याचे मार्केटिंग यावर विचारांचे आदानप्रदान होऊन शेतकºयांच्या आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. या विषयावर पहिल्या दिवशी तीन सत्र होतील.शनिवारी १६ डिसेंबर रोजी उद्घाटनीय सत्रानंतर कवी सुरेश भट सभागृहात दुपारी २.३० ते ३.१५ यादरम्यान इस्रायलचे तज्ज्ञ सिगालित बेरेन्झॉन हे ‘तोडणीनंतरची संत्रा प्रक्रिया : शेतीतून थाळीपर्यंत’ या विषयावर मार्गदर्शन करतील. यानंतर दुपारी ३.१५ ते ३.३० वाजतापर्यंत थिंपू, भूतानच्या कृषी व वनमंत्रालयाचे जिग्मे तेनझिन हे संत्रा उत्पादकांना माहिती देतील. दुपारी ३.३० वाजतापासून सायंकाळी ५ पर्यंत तांत्रिक सत्रामध्ये ‘संत्रा लागवडीमधील समस्या आणि अपेक्षा’ या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये तज्ज्ञ मान्यवर संत्र्याच्या शेतीविषयी तांत्रिक सादरीकरणासह मार्गदर्शन करतील. याअंतर्गत ‘भारतातील संत्रा लागवड : भविष्यातील वाटचाल’ या विषयावर केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था (सीसीआरआय)चे संचालक डॉ. एम.एस. लदानिया हे तांत्रिक सादरीकरण करतील.
वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचे आज उद्घाटन; पहिल्या दिवशी तीन सत्रात संत्र्यावर मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 1:46 AM