नागपूर : आपल्याकडे कावीळच्या (जॉन्डिस) उपचाराला घेऊन अनेक गैरसमज आहेत. ‘हिपॅटायटीस’चा ‘ए’ व ‘ई’ विषाणूमुळे होणारा कावीळ ९० टक्के रुग्णांमध्ये स्वत:हून बरा होतो. परंतु याचे दुष्परिणाम जीव घेणारे असल्याने योग्य वेळीच निदान व उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. उशीर झाल्यास मृत्यूचा धोका संभवतो, अशी माहिती जागतिक कावीळ दिनाच्या निमित्ताने गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. अमोल समर्थ यांनी ‘लोकमत’ला दिली.
-डोळे पिवळे होणे हे आजाराचे लक्षण
डॉ. समर्थ म्हणाले, कावीळ आजार नाही. डोळे पिवळे होणे, ताप व छातीत दुखणे ही काही लक्षणे दिसून येतात. याचे कारण वेगवेगळे असू शकतात. यामुळे तपासणी व उपचारही वेगवेगळे असतात. ‘हिपॅटायटीस’चा विषाणू ‘ई’, ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’मुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे कारण ठरते. डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, टायफाॅइड, लिव्हर, एबसेस, टीबी आणि ‘ऑटोइम्यून डिसऑर्डर’चेही कावीळ कारण ठरू शकते. यासाठी काही तपासण्या महत्त्वाच्या ठरतात.
-लांब कालावधीचा कावीळ धोकादायक
ज्यांना लांब अवधीपर्यंत कावीळ असेल आणि सोबतच पोटात ‘फ्ल्यूड’, रक्ताची उलटी किंवा शौचातून रक्त जात असेल तर तत्काळ तपासणी गरजेची असते.
-सुरुवातीच्या टप्प्यातच निदान आवश्यक
कावीळ हा लक्षण आधारित आजार आहे. यासाठी सुरुवातीच्या टप्प्यातच योग्य निदान होणे, त्याच्या लक्षणांच्या आधारावर उपचार होणे आवश्यक ठरते. ‘हिपॅटायटीस बी’ आणि ‘सी’च्या व्हायरल इन्फेक्शन तत्काळ निदान होणे महत्त्वाचे आहे. कारण यावर योग्य उपचार आहे. दुर्लक्ष केल्यास दीर्घकालीन इन्फेक्शनचे आणि साेयरोसीस किंवा लिव्हर कॅन्सरचे कारण ठरू शकते. ‘हेपेटायटिस बी’ आणि ‘ए’ला लसीकरणाद्वारे टाळता येते. ‘सी’ आणि ‘ई’ व्हायरसवर अद्यापही लस उपलब्ध नाही.
-कावीळच्या रुग्णांनी घरचाच आहार घ्यावा
कावीळच्या रुग्णांनी घरीच तयार केलेला आहार घ्यावा. जास्त तेल व मसाल्याचे पदार्थ टाळावे. दूध, ताक, दही याचा आहारात समावेश करावा. रुग्णाला थोडा-थोडा आहार देत राहायला हवे. ‘हिपॅटायटीस ए’ व ‘ई’च्या रुग्णांनी आजार असेपर्यंत स्वयंपाकगृहात जाऊ नये. आजार पसरण्याचा धोका असतो.
- उपचारच नाही हा गैरसमज
डॉ. समर्थ म्हणाले, कावीळवर उपचारच नाही हा एक गैरसमज आहे. आजाराच्या कारणांवर उपचार अवलंबून असतो. स्वयंघोषित डॉक्टर किंवा अप्रमाणित हर्बल औषधांना टाळायला हवे.