नागपूर : लहान मुलांमध्ये मूत्रपिंडाच्या विकारांमध्ये वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. प्रती दहा लाख मुलांच्या मागे १०० लहान मुले ही मूत्रपिंडाच्या (किडनी) दीर्घकालीन विकाराने (सीकेडी) ग्रस्त असतात. त्यापैकी दोन तृतियांश मुलांना जन्मत: किडनी, मूत्रमार्गाची विकृती व विकार असतात. या विकारांमध्ये प्रामुख्याने मूत्रमार्गात अडथळा (ऑब्स्ट्रक्टिव्ह नेफ्रोपॅथी) व उलट दिशेने मूत्रप्रवाह (रिफ्लेक्स नेफ्रोपॅथी) यांचा समावेश असतो, अशी माहिती बालमूत्ररोग शल्यचिकित्सक डॉ. दिनेश सारडा यांनी दिली.
१० मार्च हा दिवस जागतिक मूत्रपिंड दिन (वर्ल्ड किडनी डे) म्हणून जगभरात पाळला जातो. ‘किडनी हेल्थ फॉर ऑल’ हे या वर्षाचे घोषवाक्य आहे. डॉ. सारडा म्हणाले, लहान मुलांचे मूत्रपिंड विकसित अवस्थेत असते. यामुळे त्यांच्या विकारांकडे दुर्लक्ष केल्यास आजीवन डायलेलिस, किडनी प्रत्यारोपण, उच्चरक्तदाब, मल्टिऑरगन फेल्युअर, ॲनिमियासारख्या विकारांचा सामना करावा लागू शकतो. मात्र, वेळेत निदान आणि योग्य उपचार केल्याने दीर्घकालीन मूत्रमार्गाच्या विकारांपासून वाचविता येते.
-गर्भातच मूत्रमार्गातील अडथळ्याचे निदान
मूत्रमार्गात अडथळा व उलट दिशेने मूत्रप्रवाह या विकारांचे निदान बाळ गर्भात असताना किंवा जन्म झाल्यानंतर तातडीने करता येते. जन्मापूर्वी सोनोग्राफीत मूत्रपिंडाची विकृती आढळून आली, तर त्याकडे लक्षणांच्याअभावी दुर्लक्ष करू नये, असेही डॉ. सारडा म्हणाले.
-पालकांनी घ्यावा पुढाकार
आई-वडिलांनी बाळाच्या जन्मापूर्वी आणि बाळाचा जन्म झाल्यावर लगेच त्यास मूत्रपिंडाचे कुठले विकार तर नाहीत ना, हे समजून घेण्यास पुढाकार घ्यावा. त्यामुळे बाळाचे वेळेत निदान होऊन त्यास योग्य उपचार मिळेल व बाळ सामान्य जीवन व्यतीत करू शकेल.
डॉ. दिनेश सारडा, बालमूत्ररोग शल्यचिकित्सक
-या लक्षणांना घ्या गंभीरतेने
* गर्भावस्थेतील सोनोग्राफीत विकृती
* लघवी करताना बाळाला त्रास
* लघवी करता जोर लावणे
* वारंवार ताप येणे
* लघवी थेंब थेंब होणे
* लघवी करताना रडणे
* शारीरिक विकास खुंटणे