लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हास्य हे प्रभावी औषध आहे. मनापासून हसल्यावर मन हलके आणि ताजे होते. त्याचा चांगला परिणाम शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होतो. आत्मविश्वास वाढतो. शरीरातील ऊर्जेच्या स्तरावरही प्रभाव पाडतो. ऊर्जेमुळे तुम्ही आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता. यामुळे कामात गुणवत्ता वाढवता येते. आनंदी आणि हसत राहिल्याने तणाव वाढत नाही. हसतमुख राहिल्याने व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात आणि त्याचे वागणे सकारात्मक राहते.स्पर्धेच्या युगात माणूस हसणे विसरत चालला आहे. इंटरनेटच्या आभासीमय दुनियेमुळे आयुष्यात माणसाचा निवांतपणा हरवला आहे. ताणतणावात जगणे वाढले आहे. जीवनशैली बदल्याने नकारात्मक विचार, भावना वाढल्या आहेत. नैराश्याच्या गर्तेत अडकणाऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे. हे टाळण्यासाठी साधा सरळ उपाय म्हणजे खळखळून हसणे. हसत राहिल्याने व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात, वागणे सकारात्मक राहते. हसणारे नेहमी उत्साही राहतात. यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. हसण्याचे बरेच फायदे आहेत. हसल्यामुळे आयुष्य वाढते. आरोग्याच्या दृष्टीने हसणे किती उपयोगी आहे हे वैद्ययकीय शास्त्रानेदेखील मान्य केले आहे. म्हणूनच डॉक्टरही हसत राहण्याचा, आनंदी राहण्याचा सल्ला देतात. स्मित हास्य, खळखळून हसणं, पहाडी हास्य असे हास्यांचे विविध प्रकार असले तरी, आनंद हाच त्यामागील भाव असतो.कृत्रिम हसत राहिले तरी चालेल, पण हसामानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी म्हणाले, धकाधकीच्या जीवनात मित्र व परिवारांमध्येही खदखदून हसण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी, नकारात्मकतेमध्ये वाढ होऊन ताणतणावात जगणे वाढले आहे. त्याचा परिणाम शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होत आहे. हे टाळण्यासाठी साधा सरळ उपाय म्हणजे म्हणजे हसत राहा. कृत्रिम हसत राहिले तरी चालेल, परंतु हसत राहणे आवश्यक आहे.डॉ. जोशी म्हणाले, मानसोपचारामध्ये ‘अँगल ऑफ माऊथ’ म्हणजे ओठाचे दोन टोक जर खाली असेल तर नकारात्मक विचार करणारा, अशांत असलेला मानला जातो. परंतु जर ओठांचे हेच दोन टोक वर असेल तर मनात शांतता, आनंद, प्रसन्न व सकारात्मक विचारा करणारा असल्याचे मानले जाते. यामुळे मेंदूमधील ‘हॅपीनेस सेंटर अॅक्टिव्ह’ होते. याचे फायदे मनावर व शरीरावर होतात.हसण्याचे फायदे
- खळखळून हसल्याने आयुष्यातील दु:खाचे विस्मरण होते.
- हसल्याने जीवन निरोगी राहते, आत्मविश्वास वाढतो.
- शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढतो, कामात गुणवत्ता वाढवता येते.
- आनंदी आणि हसत राहिल्याने तणाव वाढत नाही.
- हृदयाचे आरोग्य हेल्दी राहते.
- हसत राहिल्याने चांगले विचार येतात, वागणे सकारात्मक राहते.
- हसल्याने चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो. चेहरा टवटवीत दिसतो.
- आनंदी राहिल्याने शरीराची प्रतिकारक्षमता सक्षम होते.