- १.८४ कोटी वसुलीचा अंकेक्षकांचा अहवाल : रक्कम १२ टक्के व्याजासह वसूल होणार, सहकार खात्याच्या परवानगीविना व्यवहार
मोरेश्वर मानापुरे
नागपूर : बालाजी नगरातील विश्वशांती नागरी सहकारी पतसंस्थेला अध्यक्ष व संचालकांनीच बुडवल्याचा अहवाल प्राधिकृत अंकेक्षक अॅड. हेमंत ताजने यांनी दिला असून त्यांची आर्थिक जबाबदारी ‘फिक्स’ करण्यात आली आहे. सहकार निबंधक राजेंद्र कौसडीकर यांनी अॅड. हेमंत ताजने यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. या संदर्भात लोकमतकडे अंकेक्षण अहवाल उपलब्ध आहे.
अॅड. ताजने यांनी एकूण आठ घोटाळ्यांची चौकशी करून विश्वशांती पतसंस्थेचे अध्यक्ष गुंडेराव मोहोड व इतर संचालकांवर १ कोटी ८४ लाख ३१ हजार ३५६ रुपयांच्या घोटाळ्याचा ठपका ठेवला आहे. ही रक्कम संस्थेच्या १२ संचालकांमध्ये विभागून वसूल करण्यात यावी, असे अहवालात नमूद केले आहे. १२ जणांमध्ये अध्यक्ष गुंडेराव मोहोड, उपाध्यक्ष माणिकराव घोरमोडे, संचालक छोटेलाल द्विवेदी, बाबराव फुले, ज्ञानेश्वर जारोडे, नारायण बुंडे, सुधाकर भिंगारे, कुणाल माहुरे, दीपाली गुधाने, सरिता जाधव, भगवंतराव ठाकरे (मृत), सुनील दुर्गे यांचा समावेश असून त्यांच्याकडून प्रत्येकी १५ लाख ३५ हजार ९५० रुपये वसूल करावे, असे अॅड. ताजने यांनी अहवालात म्हटले आहे.
नवोदय बँकेतील १.०५ कोटी व झाम बिल्डर्स
विश्वशांती पतसंस्थेने नवोदय बँकेत २५ लाखांच्या तीन आणि १५ लाखांच्या दोन अशा पाच ठेवीत १.०५ कोटी रुपये ठेवले. पण ठेवीची कुठलीही पावती संस्थेजवळ नाही. त्यामुळे या ठेवी किती मुदतीकरिता होत्या हे कळत नाही. नंतर नवोदय बँक बुडाली. नवोदय बँकेतील पाच ठेवी वसूल करण्यासाठी विश्वशांती पतसंस्थेने नवोदयचे कर्जदार झाम बिल्डर्सकडून बेसा/घोगरी रोडवर १.७३ कोटी मालमत्ता खरेदी केली. त्यात प्रत्येकी २९.३५ लाखांचे दोन फ्लॅट व २९.४० लाख ते ४५.२२ लाखांची चार दुकाने यांचा समावेश आहे. हा व्यवहार पतसंस्थेने सहकार खात्याची परवानगी न घेता केला आहे. ही मालमत्ता संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर आहे. त्यामुळे ही पूर्ण रक्कम १२ टक्के व्याजासह अध्यक्ष व संचालकांकडून वसूल करावी, असे अहवालात म्हटले आहे.
नागमित्र सहकारी पतसंस्थेत ठेवी
नागमित्र सहकारी पतसंस्थेत ७.६४ लाखांच्या दोन ठेवी होत्या. या ठेवी पूर्वी बुलडाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत होत्या. त्या नागमित्र पतसंस्थेत स्थानांतरित करताना सहकारी खात्याची परवानगी घेतली नाही. नागमित्र पतसंस्था बुडाल्यानंतर या ठेवीही बुडाल्या. त्यामुळे ही रक्कम व्याजासह अध्यक्ष व संचालकांकडून वसूल करावी, असे अहवालात म्हटले आहे. या ठेवी वसूल करण्यासाठी पतसंस्थेने पंकज तिडके यांची नेमणूक केली व त्यांना १,३१,४५० रुपये अदा केले. त्यानंतरही नागमित्रकडील रक्कम वसूल झाली नाही. त्यामुळे ही सर्व रक्कम अध्यक्ष व संचालकांकडून वसूल करावी, असे अहवालात म्हटले आहे.
अंकेक्षण अहवालात १२ संचालकांवर प्रत्येकी १५ लाख ३५ हजार ९५० रुपये आर्थिक नुकसान भरपाई ‘फिक्स’ केली, हे खरे आहे, पण हे चुकीचे आहे. याविरुद्ध आम्ही विभागीय सहनिबंधकांकडे याचिका दाखल केली आहे. यावर ११ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. झाम बिल्डरच्या ताब्यातील फ्लॅट आणि दुकानांची रजिस्ट्री केली आहे.
गुंडेराव मोहोड, अध्यक्ष, विश्वशांती पतसंस्था.