आनंद डेकाटेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर हे राज्यातील एक मोठे शहर असून, या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून स्थलांतरितांची संख्या वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून ही वाढ अधिक गतीने होत असून बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे उपराजधानी फुगू लागली आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ३६.७३ टक्के नागरिक बाहेरील (स्थलांतरित) आढळून आले आहेत. २०२० पर्यंत यात अंदाजे ५ टक्केपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. स्थलांतरित नागरिकांत परप्रांतीय किती याबाबत ठोस आकडेवारी नसली तरी नागपूर जिल्ह्यात स्थलांतरणाचे प्रमाण अधिक वाढल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियोजन निश्चितच गडबडले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ४६ लाख ५३ हजार ५७० इतक्या लोकसंख्येची नोंद करण्यात आली होती. यात २३ लाख ८४ हजार ९७५ पुरुष आणि २२ लाख ६८ हजार ५९५ महिलांचा समावेश होता. मात्र जनगणना करीत असताना नागपूर जिल्ह्यात १४ लाख ९३ हजार ९१४ नागरिक बाहेरील (इतर जिल्ह्यातील वा इतर राज्यातील) आढळून आले आहेत.
जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येत हे प्रमाण ३६.७३ टक्के इतके आहे. स्थलांतराची आकडेवारी लक्षात घेता स्थानिक नागपूरकरांना याचा फटका निश्चितच बसणार आहे. तो बसतोही आहे. नागपूर जिल्ह्यात कमी पल्ल्याचे अंतर गाठून स्थलांतरण करणाऱ्यांचे प्रमाण ४ लाख ५० हजार ७६६ इतके आहे. स्थलांतरित लोकसंख्येत झालेल्या नागरिकांत ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. शहरीकरणाची आस आणि पोटाची भूक ही दोन प्रमुख कारणे वाढत्या स्थलांतरणात दडली आहेत.शहराची क्रेझ, गावे ओस२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्यातील लोकसंख्या ४६ लाख ५३ हजार ५७० इतकी आहे. यातील ३१ लाख ७८ हजार ७५९ नागरिक शहरात तर १४ लाख ७४ हजार ८११ नागरिक ग्रामीण भागात राहतात. शहरी नागरीकरणाची २००१ ते २०११ या वर्षातील ही वाढ २१.६२ टक्के इतके आहे. १९९१-२००१ च्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरीकरणाचे प्रमाण २८.७० इतके आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढीचा विचार करता हे प्रमाण केवळ १.४५ टक्के आहे. त्यामुळे शहराकडे नागरिकांचा जास्त ओढा असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.लॉकडाऊनचाही परिणाम नाहीलॉकडाऊनदरम्यान राज्यातील लाखो स्थलांतरित मजूर आपापल्या राज्यात परत गेले. त्यामुळे स्थानिकांना आता नोकरीची संधी उपलब्ध असल्याने मानले जात आहे. काही प्रमाणात ही संधी असली तरी नागपूरचा विचार केला तर लॉकडाऊनचा कुठलाही परिणाम स्थलांतरितांचे ओझे कमी होण्यास झाल्याचे दिसून येत नाही. कारण नागपूरच्या एकूण लोकसंख्येत तब्बल १४ लाखावर लोक बाहेरून आलेले आहेत. लॉकडाऊनदरम्यान केवळ ५३,४३० स्थलांतरित मजूर आपापल्या राज्यात परत गेले. अनलॉक लागू झाल्यानंतर यापैकी अनेकजण परत येत आहेत.