निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवनवीन तंत्रज्ञानाच्या संशाेधनाने मानवी जीवन अधिक सुकर केले असले तरी त्यातून हाेणाऱ्या कितीतरी पटींच्या प्रदूषणाने समस्याही निर्माण केली आहे. आधी प्लॅस्टिकचा कचरा पर्यावरणासाठी डाेकेदुखी ठरली असताना ‘ई-वेस्ट’ म्हणजेच इलेक्ट्राॅनिक्स कचऱ्याने प्रदूषणाच्या समस्येचे विक्राळ रूप धारण केले आहे. माेबाईल व कॉम्प्युटरच्या अविष्काराने माेठी क्रांती केली पण त्यातून निघणारा ई-कचरा अत्याधिक घातक ठरत आहे. भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा ई-वेस्ट जनरेटर देश आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेक्षणानुसार, नागपूर शहरातून दरवर्षी १८०० ते २००० टन ई-कचरा बाहेर पडताे. विदर्भात हा आकडा २५ हजार टनांच्यावर जाण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.
उल्लेखनीय म्हणजे हा डेटा केवळ अधिकृतरीत्या गाेळा हाेणाऱ्या कचऱ्याचा आहे आणि ताे केवळ ५ टक्केच आहे. जाणकारांच्या मते, ९५ टक्के ई-वेस्ट एकतर नियमित कचऱ्यासाेबत फेकले जाते किंवा भंगार विक्रेत्यांना विकले जाते. निरुपयाेगी माेबाईल, सिमकार्ड, लॅपटाॅप, डेस्कटाॅप पीसीज, वेगवेगळे गेम्स डिव्हाईस, फॅक्स मशीन्स, अल्ट्रासाऊंड स्पीकर्स, संगणकाशी संबंधित सर्व साहित्य, व्हिडिओ कॅमेरा, टीव्ही, आयपाॅड, एमपी-३ प्लेयर्स, एलसीडी, एलईडी बल्ब, बॅटरी, चार्जर्स, वायर, सर्किट बाेर्ड, केबल बाॅक्सेस, माेटर जनरेटर, माेठ्या प्रमाणात निकामी झालेले लॅन्डलाईन फाेन्स, सिक्युरिटी इक्वीपमेंट्स, वाॅशिंग मशीन्स, रेफ्रीजरेटर्स, एअर कंडिशनर्स असा २०० च्यावर प्रकारचा ई-कचरा दरराेज लाेकांच्या घरातून बाहेर पडताे. गेल्या १० वर्षांत या कचऱ्याचे प्रमाण भरमसाठ वाढले असून त्यावर नियंत्रण मिळविणे अत्यंत कठीण झाले आहे. हा कचरा केवळ नागपूर शहर किंवा भारतासाठी नव्हे तर जगभरासाठी आव्हान ठरला आहे.
रिसायकल हाेते पण अत्यल्प
नागपूर शहरात सुरीटेक्स्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे स्वच्छ नागपूरसारख्या एनजीओच्या सहकार्याने ई-वेस्टचे कलेक्शन केले जाते. सुरीटेक्स्टच्या व्यवसाय विभागप्रमुख महिमा सुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना ३६० टन ई-वेस्ट गाेळा करण्याची परवानगी आहे, जी आता वाढून २००० टन करण्यात येईल. मात्र हा केवळ ५ टक्केच आहे. माेठ्या प्रमाणात हा कचरा भंगारात गाेळा केला जाताे व त्यातून मूल्यवान धातू काढून पुढे ताे जाळला किंवा फेकला जाताे. तर काही सामान्य कचऱ्यात फेकला जाताे. जनजागृतीचा अभाव असल्याने हा प्रकार हाेत आहे. हे धाेकादायक असून प्रदूषणाचे घातक परिणाम हाेत आहेत. संस्थेकडे गाेळा हाेणाऱ्या कचऱ्याचे रिसायकलिंग करून इलेक्ट्राॅनिक्स डिव्हाईस म्हणूनच पुनर्निर्मिती केली जात असल्याचे सुरी यांनी स्पष्ट केले.
ई-वेस्ट १० पट घातक
- इलेक्ट्राॅनिक्स कचऱ्यातून शिसे, कॅडमियम, मर्क्युरी, क्राेमियम, बेरियम, बेरिलियम व इतर धाेकादायक कंपाेनंट बाहेर पडतात.
- हा कचरा तसाच जाळल्यास अत्यंत धाेकादायक वायू प्रदूषणास कारणीभूत ठरताे.
- ई-कचऱ्याच्या प्रदूषणामुळे नर्व्हस सिस्टििम, रक्तसंस्था, किडनीचे न बरे हाेणारे आजार हाेतात.
- बालकांची ब्रेन डेव्हलपमेंट थांबते.
- श्वसनाचे व त्वचेचे धाेकादायक आजार हाेतात.
- डीएनए डॅमेज हाेण्याचा अत्याधिक धाेका. हृदय, यकृतावर घातक परिणाम.
- पर्यावरणावर गंभीर परिणाम.