लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोपेचे दोन टप्पे आहेत. एक ‘रेम स्लीप’ व दुसरी ‘नॉन रेम स्लीप’. पहिल्या टप्प्यात पापण्यांची फडफड, स्वप्नं पडणे आदी घडते. दुसऱ्या टप्प्यात पेशी जास्त प्रथिने निर्माण करतात. याचा उपयोग नादुरुस्त पेशींची, स्नायूंची दुरुस्ती व जोपासना केली जाते. विशेषत: कॅन्सरच्या पेशी नष्ट केल्या जातात. ही खूप महत्त्वाची व खरी झोप आहे. ही झोप न झाल्यास कॅन्सर होण्याचा धोका असतो. एका पाहणीत, ‘कॉल सेंटर’मध्ये रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती प्रसिद्ध निद्रा विशेषज्ञ डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.१६ मार्च हा दिवस जागतिक निद्रा दिन म्हणून पाळला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, झोप लागणे, झोप लागलेली अखंड टिकलेली असणे आणि झोपेतून जागे झाल्यावर ताजेतवाने वाटणे, हे निरामय स्थितीचे लक्षण आहे. या तिन्ही घटनांपैकी कोणत्याही एका, एकापेक्षा अधिक किंवा तिन्हींत आलेल्या अडचणीला निद्रानाश म्हणतात. जगात ३५ टक्के लोक ‘निद्रानाश’, १७ टक्के लोक ‘स्लिप अॅपनिया’ने (झोपेत श्वसनक्रिया बंद होणे) तर १० टक्के लोक हे ‘रेस्टलेस लेग सिंड्रोम’ने (झोपेत पायाचे दुखणे) पीडित आहेत. दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आता ‘व्हॉटस् अॅप व फेसबुकमुळे यात भर पडत आहे.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी झोप महत्त्वाचीडॉ. मेश्राम म्हणाले, शरीरामध्ये जैविक घड्याळ असते. जे सूर्यप्रकाशाप्रमाणे बदलत राहते. याच्याशी झोपेचा संबंध आहे. जसा जसा सूर्यप्रकाश कमी होऊ लागतो तसे शरीरात ‘मेलोटोनीन’ नावाचे हार्मोन्स स्रवू लागते आणि झोप येऊ लागते. मेंदूतील संप्रेरकांची निर्मिती, पेशींची निर्मिती आणि इतर महत्त्वाची कार्ये या जैविक घड्याळाशी, पर्यायाने झोपेशी संबंधित आहेत. त्यामुळे योग्य वेळी, योग्य प्रमाणात झोप येणे हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.