लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना काळात अनेकांमध्ये चिंतेचे प्रमाण वाढले आहे. यातूनच काहींना मानसिक आरोग्याच्या तक्रारी जडल्या आहेत, काहींमध्ये त्यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनातून होणारे मानसिक परिणाम दूरगामी ठरण्याची भीती आहे, असे मत सायकॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुशील गावंडे व सचिव डॉ. श्रीकांत निंभोरकर यांनी व्यक्त केले. (World Suicide Prevention Day; Fear of far-reaching psychological consequences due to corona)
जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या पूर्वसंध्येला ते ‘लोकमत’शी बोलत होते. समाजात मानसिक आरोग्यासंबंधी जागृती नाही. कोरोना पश्चात तर मानवाच्या सामाजिक वृत्तीला तडा जातोय. संवादाचा देखील अभाव जाणवत आहे. लॉकडाऊनसदृश परिस्थितीमुळे आंतर वैयक्तिक संबंधांचा अभाव निर्माण झाला आहे. त्याच प्रकारे व्यसनाधिनता वाढली आहे. नैराश्य असलेल्या रुग्णांचे १५ टक्के प्रमाण आहे. या बाबी आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे मतही या तज्ज्ञानी मांडले.
-भारतात रोज सरासरी ४०० आत्महत्या
डॉ. गावंडे म्हणाले, २०१९ च्या ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीनुसार भारतात रोज सरासरी ४०० आत्महत्या होतात. प्रति एक लाख लोकसंख्येमागे १० आत्महत्या ही गंभीर बाब आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात आत्महत्या अधिक आहे. वाढत्या स्पर्धेबाबत होणारे शहरीकरण देखील आत्महत्येसाठी जबाबदार ठरत आहे.
-आत्महत्या केलेल्यांपैकी ८० टक्के व्यक्तींचे यापूर्वीही प्रयत्न
डॉ. निंभोरकर म्हणाले, नैराश्याच्या गर्तेत अडकलेले कित्येक जण मानसिक आजाराचे बळी ठरत आहेत. यातून आत्महत्येचे विचार बळावत असल्याचे प्रमाण वाढत आहेत. आत्महत्या केलेल्यांपैकी ६० ते ८० टक्के व्यक्तींनी यापूवीर्ही आत्महत्येचा प्रयत्न केला असतो. जर असा आत्महत्येचा प्रयत्न केल्या गेला असेल तर, योग्य उपचारांती आत्महत्या टाळता येऊ शकते.
-आप्तस्वकीयांशी चर्चा करा!
मनात आत्महत्येचे विचार आले तर आप्तस्वकीयांशी नि:संकोच चर्चा करावी. मानसिकरोग तज्ज्ञांची मदत घ्यावी. औषधांमध्ये नियमितता ठेवावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं बंद करू नयेत.
डॉ. सुशील गावंडे, अध्यक्ष, सायकॅट्रिक सोसायटी
-लक्षणांना वेळेत ओळखा!
आत्महत्येची पूर्वलक्षणे लक्षणे आढळून आली तर निश्चितच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. वेळेत लक्षण ओळखून मदत मिळाली तर आत्महत्या टाळू शकते व निश्चितच जीव वाचू शकतो.
डॉ. श्रीकांत निंभोरकर, सचिव, सायकॅट्रिक सोसायटी