सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्षयरोगाचे जे रुग्ण व्यवस्थित औषधी (डॉट्स) घेत नाही किंवा अर्धवट घेतात त्यांना क्षयरोगाची पुढची पायरी ‘मल्टीड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’ (एमडीआर-टीबी) आणि त्याहीपुढे जाऊन ‘एक्सटेसिव्ह ड्रग रेझिसटन्ट ट्युबरक्युलॉसिस’ (एक्सडीआर-टीबी) होतो. गेल्या ११ वर्षात नागपूर विभागात ‘एमडीआर’चे १३१९ रुग्ण तर ‘एक्सडीआर’चे ५३ रुग्ण आढळून आले. धक्कादायक म्हणजे, या दोन्ही रोगाचे सर्वाधिक रुग्ण २५ ते ३४ वयोगटातील आहेत.सध्या क्षयरोगाचा (टीबी) प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून, देशात प्रत्येक वर्षी २९ लाख जणांना नव्याने या संसर्गजन्य रोगाची लागण होते. महाराष्ट्रात २०१७ मध्ये दोन लाख नव्या क्षयरोग रुग्णांची नोंद झाली असून, त्यातील १ हजार रुग्णांना पुरेसा उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वास्तव सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. गरीब नागरिकांमध्ये पुरेसे उपचार आणि कुपोषण यामुळे क्षयरोगाचे प्रमाण जास्त असून, देशात प्रत्येक वर्षी सरासरी ४.२० लाख गरीब नागरिकांना क्षयरोगाची बाधा होत आहे. यातही जे रुग्ण व्यवस्थित औषध घेत नाही किंवा अर्धवट औषध घेतात त्यांना ‘एमडीआर’ व नंतर ‘एक्सडीआर’ला सामोरे जावे लागत आहे. हे एक नव्हे आव्हान वैद्यकीय क्षेत्रासमोर आहे.
तरुणांमध्ये एमडीआर टीबी ३०.२५ टक्केआरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, नागपूर विभागात २००७ ते २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत ‘एमडीआर टीबी’चे १३१९ रुग्ण आढळून आले. यात २५ ते ३४ वयोगटात सर्वाधिक म्हणजे ३९९ रुग्ण आढळून आले. याची टक्केवारी ३०.२५ टक्के आहे. ० ते १४ या वयोटात या रोगाची टक्केवारी ‘०.९८’ टक्के, त्या खालोखाल १५ ते २४ वयोगटात १९ .८६ टक्के, ३५ ते ४४ वयोगटात २२.३६ टक्के, ४५ ते ५४ वयोगटात १६.५२ टक्के, ५५ ते ६४ वयोगटात ६.२१ टक्के तर ६५ व त्यावरील वयोगटात ३.७९ टक्के प्रमाण आहे.
क्षयरोगाने दरवर्षी सात लाख रुग्णांचा मृत्यूडॉ. सुशांत मेश्राम यांनी आपल्या प्रास्तविकात म्हटले की, देशात क्षयरोगाचे सुमारे २८ लाख रुग्ण आहेत. यात दरवर्षी ७ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. धक्कादायक म्हणजे, या रोगामुळे साधारण ३ लाख मुलांना शाळा सोडावी लागते. कर्तापुरुष क्षयरोगाला बळी पडत असल्याने दरवर्षी १ लाख महिला विधवा होतात. क्षयरोग पूर्णत: बरा होऊ शकत असताना ही आकडेवारी भयावह आहे. यामुळे केवळ वैद्यकीय क्षेत्रच नव्हे तर प्रत्येक क्षेत्राने यात पुढाकार घेऊन क्षयरोगाशी लढा देणे आवश्यक आहे.
एक्सडीआर टीबीचे प्रमाण ३३.९६ टक्केनागपूर विभागात २००७ ते २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत ‘एक्सडीआर टीबी’चे ५३ रुग्ण आढळून आले. यात २५ ते ३४ वयोगटात सर्वाधिक म्हणजे १८ रुग्णांची नोंद झाली असून याची टक्केवारी ३३.९६ आहे. १५ ते २४ या वयोगटात १५.०९ टक्के, ३५ ते ४४ वयोगटात २२.६४ टक्के, ४५ ते ५४ या वयोगटात १६.९८ टक्के, ५५ ते ६४ वयोगटात ९.४३ टक्के तर ६५ व त्यावरील वयोगटात १.८८ टक्के रुग्ण आढळून आले आहे.
हार्माेनल बदल, तणाव व स्वत:कडे दुर्लक्ष२५ ते ३४ वयोगटातील तरुणांमध्ये ‘एमडीआर टीबी’ व ‘एक्सडीआर टीबी’चे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येतात. या मागील कारण म्हणजे, लहान वयात क्षयरोगाचे संक्रमण झाल्यानंतर व्यवस्थीत किंवा अर्धवट औषधे घेतल्याने होतो. शिवाय या वयात हार्माेनल बदल होतात. ताण वाढलेला असतो. पुरेशी झोप घेतली जात नाही. आहाराकडे दुर्लक्ष केले जाते, याच वयात वाईट सवयी व व्यसन लागते. याचा परिणाम रोगप्रतिकारक्षमतेवर होतो. हे कमी होताच या दोन्ही रोगाचा विळखा घट्ट होतो.-डॉ. सुशांत मेश्राम, विभाग प्रमुख, रेस्पीरेटरी मेडिसीन विभाग, मेडिकल