लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात २५ व्यक्तींमध्ये थॅलेसेमियाचा एक मेजर रुग्ण आढळून येतो. वर्षाला थॅलेसेमिया मेजरचे सुमारे १० हजार बाळ जन्माला येतात. याबाबत फारशी जनजागृती नसल्याने व शासकीय रुग्णालयात याची तपासणी होत नसल्याने हे थांबविणे कठीण होत असल्याचे थॅलेसेमिया व सिकलसेल सेंटरचे संचालक व बालरोग तज्ज्ञ डॉ. विंकी रुघवानी यांचे म्हणणे आहे. सध्या रक्ताच्या तुटवड्यामुळे थॅलेसेमियाचे रुग्ण अडचणीत आले आहेत. लसीकरणापूर्वी १८ वर्षांवरील प्रत्येकाने रक्तदान करण्याचे आवाहनही डॉ. रुघवानी यांनी केले.
जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या पूर्वसंध्येवर ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. रुघवानी म्हणाले, थॅलेसेमिया आनुवंशिक व्याधी आहे. थॅलेसेमियाचे तीन प्रकार आहेत. यात आजाराची व्यक्ती वाहक असते, ‘इन्टरमीडिया’ असते व ‘मेजर’ (घातक) असते. दोन ‘थॅलेसिमिया मायनर’ पीडित स्त्री-पुरुष यांच्यापासून जन्म घेणारे अपत्य ‘थॅलेसेमिया मेजर’ असू शकते. या आजारात लहान मुलांमध्ये हिमोग्लोबीनची निर्मिती थांबते व त्यांना वारंवार रक्त द्यावे लागते. अशा स्थितीतील हा आजार गंभीर होतो. यात प्रामुख्याने लोह याची कमतरता असते. दुसरीकडे वारंवार रक्त दिल्याने लोह याची मात्रा आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते. यामुळे हा आजार गंभीर होतो. भारतात या आजाराच्या वाहकांची संख्या सुमारे दीड कोटीवर आहे. यात थॅलेसेमियाचा घातक (मेजर) प्रकारातील सुमारे दोन लाख रुग्ण आहेत. या आजारातील रुग्णांची मृत्यूसंख्या कमी करायची असेल तर प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार, औषधी व सोयी मिळणे आवश्यक आहे.
- कोरोनामुळे पीडित रुग्ण अडचणीत
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सामाजिक कार्यक्रमावर बंदी आहे. शाळा-महाविद्यालये बंद आहेत. यामुळे रक्तदान शिबिर कमी प्रमाणात होत आहेत. यातच १८ वर्षांवरील युवकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण होत असल्याने व लसीकरणानंतर दोन महिन्यापर्यंत रक्तदान करता येत नसल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्त मिळविण्यास कठीण जात आहे. तसेच थॅलेसेमियाच्या रुग्णांना वारंवार रक्ताची गरज भासते. यामुळे ‘एचआयव्ही’ व ‘हेपॅटायटिस’ यासारख्या रोगाच्या संक्रमणाची भीती असते, हे टाळण्यासाठी सरकारतर्फे थॅलेसेमियाच्या रुग्णांना ‘नॅट टेस्टेड ब्लड’ देण्यात यावे, अशी मागणीही रुघवानी यांनी केली.
-विवाहपूर्व थॅलेसेमियाची चाचणी आवश्यक
दोन ‘थॅलेसिमिया मायनर’ पीडित स्त्री-पुरुष यांच्यापासून जन्म घेणारे अपत्य अत्यंत घातक थॅलेसेमिया पीडित होऊ शकते. ज्यामुळे जीवहानी होण्याची भीती असते. याकरिता प्रत्येक व्यक्तीने विवाहपूर्व किंवा ज्या विवाहित स्त्री-पुरुष अपत्यासाठी इच्छुक आहेत, अशा व्यक्तींनी थॅलेसेमिया मायनरची रक्त चाचणी करावी, असे आवाहनही डॉ. रुघवानी यांनी केले.