नागपूर : शरीरावर पांढरे डाग किंवा कोड (व्हीटिलीगोे) हा संसर्गजन्य नाही. तो एकत्र राहून किंवा जवळच्या संपर्कात राहून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. परंतु अशा व्यक्तीकडे पाहण्याच्या नजरा निराळ्याच असल्याने त्याचा त्या व्यक्तीचा मानसिकतेवर परिणाम होतो. या आजाराचे लोकसंख्येत जवळपास १ ते २ टक्के लोक असतात. या आजाराची व उपचाराची जनजागृती होणे गरजेचे असल्याचे ‘एम्स’च्या त्वचारोग विभागाचे म्हणणे आहे.
-‘व्हीटिलीगो’ हा पिगमेंटेशनचा विकार
‘व्हीटिलीगो’ हा एक ‘पिगमेंटेशन’चा विकार आहे. ज्यामध्ये रुग्णाच्या शरीरावर पांढऱ्या रंगाचे डाग येतात. हे पांढरे डाग रुग्णाला कोणतीही प्रकारची शारीरिक व्यथा आणत नाहीत. हे डाग शरीराच्या एखाद्या भागावर स्थिर राहू शकतात किंवा पूर्ण शरीरावर पसरू शकतात. या आजारात प्रभावित भागावरील केसांचा रंगदेखील पांढरा होऊ शकतो. अंदाजे १५ टक्के रुग्ण ‘व्हीटिलीगो’सोबत इतर ‘ऑटोइम्म्यून’ रोगांनी ग्रस्त होऊ शकतात.
- गोऱ्या त्वचेचे आकर्षण असतानाही ‘व्हीटिलीगो’ला डावलले जाते
आपल्या समाजात गोऱ्या त्वचेचे विशेष आकर्षण जरी असले तरी, ‘व्हीटिलीगो’चा त्रास असलेल्या लोकांना डावलले जाते, हे विचित्र आहे. त्वचेच्या रंग वेगळा जरी असला तरी, भेदभाव केला जाऊ नये. कारण, त्वचेच्या रंगाचा चारित्र्याशी आणि क्षमतेशी काहीही संबंध नसल्याचे त्वचा रोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
- पांढऱ्या डागाची कारणे
या आजारामध्ये त्वचेतील रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशी (मेलानोसाइट्स) नष्ट होतात, त्यामुळे त्वचेचा रंग जातो. यासाठी स्वयंप्रतिकार (ऑटोइम्म्यून), अनुवंशिकता, ऑक्सिडेटिव्ह ताण व न्यूरल घटक कारणीभूत ठरतात.
- असे आहेत उपचार
पांढऱ्या डागावरील उपचार दोन टप्प्यांत केंद्रित केला जातो. प्रथम, रोगाची प्रगती थांबवणे, दुसरे, पांढऱ्या डागांवर रंग आणण्यावर लक्ष केंद्रित करणे. यासाठी मलम, औषधी दिली जातात. ‘फोटोथेरपी’मध्ये नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाश स्त्रोतांचा वापर रंग आणण्यासाठी केला जातो. एकदा रोग स्थिर झाल्यानंतर, रंग आणण्यासाठी विविध शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. ‘व्हीटिलीगो’वरील उपचाराला प्रतिसाद न देणारे चट्टे लपविण्यासाठी ‘कॉस्मेटिक कॅमोफ्लॉज’ वापरले जाऊ शकते.
- ‘व्हीटिलीगो’चा मानसिक प्रभाव
:‘व्हीटिलीगो’ग्रस्त असलेल्या रुग्णांना जीवनाची गुणवत्ता, चिंता, नैराश्य आणि इतर मनोसामाजिक अडचणींचा धोका असतो.
: त्यांना अनेकदा कलंक आणि सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतो.
: कधीकधी, संपूर्ण कुटुंबदेखील व्यथित होते
: भूतकाळातील वाईट कृत्यांमुळे किंवा शापामुळे हा आजार होतो, हा चुकीचा समज आहे.
: याचा एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेवर विपरित परिणाम होत नाही.